Ajit Pawar | जनसंवादात तक्रारींचा पूर ; पाणी, रस्ते, स्वच्छता…नागरिकांचा संताप उपमुख्यमंत्र्यांसमोर फुटला

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडकरांनी तब्बल ४८०० तक्रारी मांडल्या. यातीत बहुतेक समस्या या पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक यांच्याशी संबंधित होत्या. त्यापैकी 1,800 तक्रारी तत्काळ निकाली काढल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. 25 पेक्षा जास्त शासकीय विभागांनी सहभाग घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपरी येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या जनसंवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिक, विविध शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधी एकत्र आले. या उपक्रमासाठी डिजिटल हेल्पलाइन, व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्कसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरात आणले गेले, ज्यामुळे पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व निश्चित झाले.
आजच्या कार्यक्रमात 25 पेक्षा जास्त शासकीय विभागांनी सहभाग घेतला. एकूण 4,800 तक्रारींची नोंद झाली असून त्यापैकी सुमारे 1,800 तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले. बहुतांश तक्रारी पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक यांच्याशी संबंधित होत्या. अजितदादा पवार यांनी स्वतः संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवत तक्रार निवारणासाठी संबंधित विभागांना तात्काळ मार्गदर्शन केले.
मी येथेच आहे..
अजित पवार म्हणाले, आज पिंपरीकरांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारी काळजीपूर्वक ऐकल्या. स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत अनेक अडचणी त्वरित सोडवल्या. उर्वरित तक्रारी मंत्रालय, संबंधित मंत्रालये व विभागांपर्यंत पोहोचवण्यात येतील. प्रत्येक प्रकरणाचा फॉलो-अप करून त्याचे समाधान मिळेल याची खात्री आम्ही करून घेणार आहोत. पुढील दोन दिवस मी येथेच आहे असा अप्रत्यक्ष इशाराही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिला.
प्रशासकीय राजवटीवर प्रश्नचिन्ह..
जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम एक उत्कृष्ट उपक्रम असला तरी या कार्यक्रमाने महापालिकेतील प्रशासकीय राजवटीवर प्रश्नचिन्ह उपस्िथत केले आहे. या कार्यक्रमात एक दोन नव्हे तर तब्बल ४८०० तक्रारी आल्या. बहुतेक तक्रारी या पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक यांच्याशी संबंधित होत्या.या समस्या जर उपमुख्यमंत्र्यांनी सोडवायच्या असतील तर महापालिकेत कार्यरत असलेले शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचारी काय काम करतात ? असा प्रश्न उपस्िथत होत आहे. महापालिकेकडून घेण्यात येणाऱ्या जनसंवाद सभांचे फलित काय?





