Agarkar Extension Uncertainty : रोहितच्या भविष्यावरून बीसीसीआय आणि निवड समितीत वाद? अजित आगरकरांची गच्छंती होण्याची शक्यता
Agarkar Extension Uncertainty : अंतर्गत मतभेदांमुळे भारताच्या वरिष्ठ निवड समितीचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागू शकते.

Ajit Agarkar Chief Selector Extension Uncertainty Rohit Sharma Future : सध्या शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असून हा दौरा संपल्यानंतर बीसीसीआयचे उच्चपदस्थ अधिकारी निवड समितीसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) भविष्यावरून बीसीसीआय आणि निवड समितीमध्ये एकमत होत नसल्याचे समोर आले आहे. याच अंतर्गत मतभेदांमुळे भारताच्या वरिष्ठ निवड समितीचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर (Ajit Agarkar) यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागू शकते, कारण बोर्ड आता त्यांचा करार वाढवण्यास (Extension) फारसे उत्सुक नसल्याची चर्चा आहे.
रोहित शर्माच्या भविष्यावरून नेमका वाद काय?
इंग्लंड दौऱ्यादरम्यान लॉर्ड्सवरील कसोटी सामना हा रोहित शर्माचा शेवटचा सामना असेल, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने मिळून रोहितच्या जागी युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालला एकदिवसीय संघात आणण्याची पूर्ण योजना आखली होती. मात्र, लॉर्ड्स कसोटीपूर्वी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी पुढे येत या चर्चा फेटाळून लावल्या. निवड समिती रोहितचा निरोप निश्चित करत असतानाच, बोर्ड आणि सेलेक्टर्स यांच्यात या मुद्द्यावर मतभेद उफाळून आले.
यशाचा डोंगर तरीही आगरकरांचा कार्यकाळ धोक्यात –
🚨 BAD NEWS FOR TEAM INDIA 🚨
BCCI IS NOW RECONSIDERING AJIT AGARKAR’S FUTURE AS CHIEF SELECTOR.
HIS 2027 ODI WORLD CUP EXTENSION IS NO LONGER CERTAIN. pic.twitter.com/laVM6ubmwr
— Indian cricket (@Cricketpaglu45) August 15, 2026
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, बीसीसीआय सुरुवातीला अजित आगरकर यांचा कार्यकाळ आणखी एका वर्षासाठी वाढवण्यास तयार होते. आगरकरांच्या कार्यकाळात टीम इंडियाने दोन टी-२० विश्वचषक, एक चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन आशिया कप अशी ऐतिहासिक जेतेपदे पटकावली आहेत. तरीही, रोहित शर्माच्या भविष्यावरील मतभेदांमुळे आगरकर यांना मिळणारे एक वर्षाचे एक्स्टेंशन आता पूर्णपणे संकटात सापडले आहे.
२०२३ मध्ये झाली होती निवड; २०२७ वर्ल्ड कपचे काय?
अजित आगरकर यांची ४ जुलै २०२३ रोजी बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा ३ वर्षांचा कार्यकाळ आता संपुष्टात येत आहे. आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत (ODI World Cup 2027) आगरकरांकडे ही जबाबदारी कायम ठेवली जाईल असे वाटत असतानाच, आता बीसीसीआय त्यांच्या कराराचे नूतनीकरण करणार की नव्या चेहऱ्याला संधी देणार, हे लवकरच स्पष्ट होईल.





