Ajinkya Rahane Slams : सलग दोन पराभवानंतर अजिंक्य रहाणे टीकाकांरावर संतापला; म्हणाला, ‘माझ्या यशावर जळणाऱ्यांची…’
Ajinkya Rahane Slams : मैदानावर अतिशय शांत आणि संयमी राहणारा रहाणे यावेळी मात्र पत्रकार परिषदेत टीकाकारांवर तुटून पडला.

Ajinkya Rahane Slams Critics after KKR vs SRH match : आयपीएल २०२६ च्या सहाव्या सामन्यात एसआरएचकडून झालेल्या दारुण पराभवानंतर केकेआरच्या गोटात अस्वस्थता पाहायला मिळत आहे. एरवी शांत स्वभावासाठी ओळखला जाणारा कर्णधार अजिंक्य रहाणे यावेळी टीकाकारांवर चांगलाच संतापला असून त्याने पत्रकार परिषदेत आपल्या फलंदाजीच्या शैलीवरून परखड मते मांडली आहेत.
अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
ईडन गार्डन्सवर घरच्या मैदानात ६५ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर टीकेची झोड उठली आहे. हैदराबादविरुद्ध केवळ ८ धावांवर बाद झाल्याने त्याच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यावर उत्तर देताना रहाणे म्हणाला, “टीकाकार सामना न पाहताच मते बनवतात. माझ्या वाट्याला आलेले यश पाहून कदाचित लोक जळत असावेत. पण मी त्याची चिंता करत नाही. लोक माझ्याबद्दल चर्चा करत आहेत, ही चांगलीच बाब आहे.”
“माझा स्ट्राईक रेट सर्वोत्तम” –
Ajinkya Rahane in IPL since 2023:
37 – Inns
1033 – Runs
29.51 – Avg
147.78 – Strike RateDo you agree with his statement?#AJINKYARAHANE #KKR #IPL pic.twitter.com/iecFSLa3NH
— Infinite Info (@infiniteInfos) April 3, 2026
स्वतःच्या स्ट्राईक रेटचा बचाव करताना रहाणेने आकडेवारीचा दाखला दिला. तो म्हणाला की, २०२३ पासून माझा स्ट्राईक रेट सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत आहे. “जे लोक माझ्यावर टीका करत आहेत, ते कदाचित सामने पाहत नाहीत किंवा माझ्याविरोधात एखादा अजेंडा चालवला जात असावा,” असा टोलाही त्याने लगावला. आकडेवारीनुसार, २०२३ पासून पॉवर-प्लेमध्ये रहाणेचा स्ट्राईक रेट १६७.७८ इतका प्रभावी आहे. या यादीत तो ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि फिल साल्ट यांच्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे.
स्पिनर्स ठरतायत डोकेदुखी –
अजिंक्य रहाणेचा पॉवर-प्लेमधील खेळ आक्रमक असला, तरी ७ ते १५ या मधल्या षटकांत फिरकीपटूंविरुद्ध तो चाचपडताना दिसत आहे. या षटकांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट घसरून ११४.०२ पर्यंत खाली येतो. हैदराबादविरुद्धच्या सामन्यातही रहाणेला सूर गवसला नाही आणि तो स्वस्तात परतला. सलग दोन पराभवांमुळे केकेआर गुणतालिकेत तळाला गेली असून, आता रहाणे या टीकेला आपल्या बॅटने कसे उत्तर देतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





