Ajinkya Rahane : ‘…निवड प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी’, अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांना केले आवाहन

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघात हवं होतं स्थान –
अजिंक्य रहाणेने आपल्या निवेदनात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत आपल्याला संधी मिळायला हवी होती, असे सांगितले. “वयापेक्षा खेळण्याची पद्धत महत्त्वाची आहे. मायकेल हसीने वयाच्या ३० नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू केलं आणि उत्कृष्ट कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये अनुभवाला खूप महत्त्व आहे. मला वाटतं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाला माझ्या अनुभवाची गरज होती,” असे रहाणे म्हणाला. ३४-३५ वयानंतर खेळाडू अधिक जबाबदारीने खेळतात आणि त्यांची समज व तंत्र संघाला उपयुक्त ठरते, असेही त्याने नमूद केले.
निवडकर्त्यांशी संवादाचा अभाव; पारदर्शकतेची मागणी
Ajinkya Rahane said, “I thought an experienced player like me should get more chances. There was no communication. I can focus on only the controllable things. Indian team needed me in Australia for BGT and I was fully ready for it”. (Express Sports). pic.twitter.com/ci78EbbD8u
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2025
अजिंक्य रहाणेने निवड प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करताना निवडर्त्यांनी आपल्याशी कोणताही संवाद साधला नसल्याचे उघड केले. “माझ्यासारख्या अनुभवी खेळाडूशी निवड प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी होती. माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. मी फक्त माझ्या हातात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो,” असे त्याने स्पष्ट केले. या निवेदनातून रहाणे निवड प्रक्रियेवर नाराज असला तरी आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसते.
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : रणजी ट्रॉफीचा मोडला ६३ वर्षांचा जुना विक्रम! अवघ्या ५४० चेंडूत आटोपला सामना
छत्तीसगडविरुद्ध शतक; मुंबईची मजबूत स्थिती
छत्तीसगडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात रहाणेची १५९ धावांची खेळी त्याच्या दर्जेदार फलंदाजी आणि संयमाचा नमुना होती. त्याने ३०३ चेंडूंत २१ चौकारांसह ही खेळी केली आणि मुंबईला मजबूत स्थितीत आणले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईने ८ बाद ४०६ धावा केल्या. या खेळीने रहाणेने वय केवळ एक आकडा आहे आणि तो अजूनही भारतीय संघासाठी तितक्याच उत्साहाने व तंदुरुस्तीने खेळू शकतो, हा संदेश स्पष्टपणे दिला.
रणजीतील कामगिरी ठरेल निर्णायक?
रहाणेची ही खेळी आणि त्याचे निवेदन भारतीय क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. आता निवडकर्ते त्याच्या अनुभवाचा आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा विचार करतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. सध्या रहाणे आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करत असून, देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची कामगिरी भारतीय संघात पुनरागमनाचा मार्ग मोकळा करू शकते.





