आगीतून थरारक सुटका ! अकोल्याच्या ऐश्वर्याने चादरीत गुंडाळून वाचवला जीव; विमान अपघातातील चमत्कार

Air India Plane Cras : अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 चा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये २४१ प्रवासी आणि मेघानीनगर परिसरातील २४ रहिवाशांसह २६५ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अकोल्याच्या २२ वर्षीय ऐश्वर्या तोष्णीवाल हिने चमत्कारिकरीत्या आपला जीव वाचवला. गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी ऐश्वर्या, अपघातावेळी होस्टेलच्या दुसऱ्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. Air India Plane Cras |
विमान कोसळल्याने निर्माण झालेल्या प्रचंड धुरातून तिने स्वतःला चादरीत गुंडाळून थरारक पलायन केले. ऐश्वर्या मूळ अकोल्यातील दुर्गा चौक येथील रहिवासी आहे. अपघाताच्या वेळी मोठ्या आवाजाने ती जागी झाली आणि सर्वत्र धूर पसरलेला पाहिला. Aishwarya Toshniwal |
धीर न सोडता तिने चादरीत स्वतःला लपेटले आणि अंधार-धुराच्या गर्दीतून पाचव्या मजल्यावरून खाली उतरत जीव वाचवला. या दरम्यान तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजले, पण ती सुखरूप आहे.
घाबरलेल्या अवस्थेत ऐश्वर्याने वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन केला. ते दुर्गा चौकातील साड्यांच्या दुकानात होते. “टीव्हीवर बातमी पाहून डोकं सुन्न झालं, पण देवाने आमच्या मुलीला वाचवलं,” असे अमोल यांनी सांगितले. ऐश्वर्याच्या आई माधुरी, आजी-आजोबांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
“वाढदिवसासाठी आलेली पोरी अशा संकटातून वाचली, यासाठी देवाचे आभार,” असे आजोबा म्हणाले. ऐश्वर्याने हा आपल्या आयुष्यातील सर्वात भयावह अनुभव असल्याचे सांगितले. Aishwarya Toshniwal |
महाराष्ट्रातील १२ जणांचा मृत्यू
या अपघातात महाराष्ट्रातील १२ जणांचा मृत्यू झाला, यात मुख्य वैमानिक सुमीत सभरवाल, क्रू मेंबर्स दीपक पाठक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे, अपर्णा महाडिक, साईनीता चक्रवर्ती आणि प्रवासी मयूर पाटील, यशा कामदार, आशा पवार, महादेव पवार यांचा समावेश आहे. ऐश्वर्याच्या सुटकेने अकोल्याला दिलासा मिळाला, पण इतर कुटुंबांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.





