Satara | सातार्यात विमानतळ आणि विमान उद्योग यावेत

सातारा, (प्रतिनिधी) – सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ, विमान तयार करणे आणि वाहतुकीसाठी लागणारे सुटे भाग उत्पादित करण्याचे उद्योग यावेत,
अशी मागणी भाजपचे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे कराड येथील बैठकीत केली.
सातारा हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा महत्त्वाचा जिल्हा असल्याने, या ठिकाणी औद्योगिक वसाहतसुद्धा महत्त्वाची आहे.
सातारा विधानसभा मतदारसंघात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ झाल्यास, इतर राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय उद्योग सातार्यात येतील. एमआयडीसीचा पर्यायाने सातार्याचा विकास होऊन, युवकांना आंतरराष्ट्रीय उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळेल.
सातारा हे राज्यातील महत्त्वाचे ऐतिहासिक शहर आहे. युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केलेले कास पुष्प पठार शहरापासून जवळ आहे. विधानसभा मतदारसंघाला निसर्गसंपदेची भरपूर देणगी लाभली आहे.
निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केवळ राज्यातील नव्हे, तर देशविदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.
या पर्यटकांना मुंबई किंवा पुणे येथे विमानाने येऊन, सातार्याकडे रस्त्याने प्रवास करावा लागतो. त्यामुळे काही पर्यटक टाळाटाळ करतात. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे.
विमान तयार करण्यासाठी आणि वाहतुकीसाठी लागणारे सुटे भाग उत्पादित करण्याचे उद्योग सातार्यात आल्यास, येथील युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील. या बाबींचा विचार करून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे, अशी मागणी गोसावी यांनी केली.
याबाबतचे निवेदन मोहोळ यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे सातारा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख अविनाश कदम, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सातारा ग्रामीण पश्चिम मंडलाध्यक्ष महेश गाडे, जावळी मंडलाध्यक्ष श्रीहरी गोळे,
भाजप जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक धनंजय जांभळे, अॅड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, धनंजय पाटील, सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे, नितीन कदम, सातारा ग्रामीण सरचिटणीस वैभव यादव, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम बोराटे, सोशल मीडिया शहराध्यक्ष कृणाल मोरे उपस्थित होते





