हवेतून हवेत मारा करणारी “अस्त्र”ची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली – देशांतर्गत विकसित करण्यात आलेल्या तेजस या लढाऊ विमानातून हवेतून हवेतल्या लक्ष्यावर अचूक मारा करण्याची क्षमता असलेल्या “अस्त्र’ या क्षेपणास्त्राची महत्वाची चाचणी आज यशस्वी झाली. गोव्याच्या किनारपट्टीजवळ घेण्यात आलेली ही चाचणी लढाऊ विमानांच्या मारक क्षमतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जाते आहे.
तेजस या लढाऊ विमानातून जमिनीपासून 20 हजार फूट उंचीवर ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीसाठी निश्चित करण्यात आलेली सर्व उद्दिष्टे यशस्वीपणे गाठण्यात आली. नियोजनाप्रमाणे सर्व निकष पाळण्यात आले असल्यामुळे ही महत्वाची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
चाचणी प्रक्षेपणाचे परीक्षण एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि सेंटर फॉर मिलिटरी एअरवॉर्थिनेस अँड सर्टिफिकेशनच्या अधिकाऱ्यांसह डायरेक्टरेट जनरल ऑफ एरोनॉटिकल क्वालिटी ऍश्युरन्सच्या चाचणी संचालक आणि शास्त्रज्ञांनी केले.
“डीआरडीओ’चे नवीन अस्त्र
“अस्त्र’ हे देशांतर्गत विकसित करण्यात आलेले हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र असून संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, संशोधन केंद्र इमरात आणि “डीआरडीओ’च्या इतर प्रयोगशाळांनी विकसित केले आहे.अस्त्रच्या या यशस्वी चाचणीमुळे तेजसच्या मारक क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्व तंत्रज्ञ आणि संशोधकांचे अभिनंदन केले आहे.





