Air India Flight Issue: लंडनहून बेंगळुरूकडे झेपावलेल्या एअर इंडियाच्या बोइंग ७८७-८ विमानामध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. विमानाच्या ‘फ्यूल कंट्रोल स्विच’मध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे तातडीने लँडिंग केले. या घटनेमुळे विमानात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे एअरलाईन प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेनंतर संबंधित विमान तातडीने तपासासाठी ग्राउंडेड करण्यात आले आहे. एअर इंडियाने अधिकृत निवेदन – या गंभीर प्रकरणाची दखल घेत एअर इंडियाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. वैमानिकाने इंधन नियंत्रण स्विचमधील संभाव्य त्रुटी निदर्शनास आणून दिल्यानंतर कंपनीने तातडीने पावले उचलली असून, मूळ उपकरण निर्माता (OEM) कंपनीला या तपास प्रक्रियेत सामील करून घेण्यात आले आहे. नागरी विमान वाहतूक संचालनालयाला (DGCA) या संपूर्ण घटनेची रीतसर माहिती देण्यात आली असून सुरक्षेच्या कारणास्तव विमानाची कसून चौकशी केली जात आहे. प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. ताज्या घटनांमुळे भीती – विशेष म्हणजे, गेल्या काही काळातील विमान अपघातांच्या पार्श्वभूमीवर या घटनेने प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण केली होती. २८ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता, त्या आठवणी या घटनेमुळे पुन्हा ताज्या झाल्या. तसेच, गेल्या वर्षी १२ जून रोजी अहमदाबाद ते लंडन दरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात २६० प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या अपघाताच्या चौकशी अहवालातही तांत्रिक बिघाडाकडेच बोट दाखवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर, डीजीसीएने एअर इंडियाच्या सर्व बोइंग ७८७ विमानांच्या इंधन स्विचची तपासणी करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यावेळी कोणताही दोष आढळला नव्हता. आता पुन्हा एकदा हा बिघाड समोर आल्याने विमान सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.