Tata Board Meeting: टाटा सन्स बोर्डाची उद्या बैठक; तोट्यातील कंपन्यांवर होणार महत्त्वाची चर्चा
Tata Board Meeting: उद्याच्या बैठकीत विशेषतः तोट्यातील व्यवसायांवरील दबाव, त्यांची पुनर्बांधणी आणि समूहाच्या भविष्यातील गुंतवणूक धोरणावर सखोल चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tata Board Meeting: टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवारी (दि. 26 मे) होणार असून, समूहातील तोट्यात चाललेल्या कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा आणि पुढील धोरणावर या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीचा विषय मात्र बैठकीच्या अजेंड्यावर नसल्याचे समजते.
समूहातील वाढते अंतर्गत मतभेद आणि काही नव्या व्यवसायांमधील वाढता आर्थिक ताण यामुळे ही बैठक विशेष महत्त्वाची मानली जात आहे. तोट्यातील कंपन्यांकडून त्यांच्या आर्थिक स्थितीबाबत तसेच पुनरुज्जीवन आराखड्याबाबत सादरीकरण केले जाऊ शकते.
सूत्रांच्या माहितीनुसार, चंद्रशेखरन आणि नोएल टाटा यांनी 23 आणि 24 मे रोजी विविध कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. आर्थिक वर्ष 2025 मध्ये टाटा समूहाच्या असूचीबद्ध व्यवसायांना सुमारे 10,905 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. हा तोटा वाढून जवळपास 29 हजार कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाढत्या तोट्याबाबत चिंता –
विशेषतः टाटा डिजिटल, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील उपक्रम आणि एअर इंडिया यांसारख्या नव्या व्यवसायांमधील वाढत्या तोट्याबाबत नोएल टाटा यांनी चिंता व्यक्त केल्याचे बोलले जात आहे. तसेच टाटा संन्सचे समभाग बाजारात सूचीबद्ध करण्याबाबतही त्यांची अनास्था असल्याचे समजते.
दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँक ने टाटा संसला देशातील महत्त्वाच्या बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांमध्ये (NBFC) वर्गीकृत केले असून, नियमानुसार अशा कंपन्यांसाठी सूचीबद्धता अनिवार्य ठरते. प्रॉक्सी सल्लागार संस्था इनगव्हर्न रिसर्च सर्व्हिसेस नेही टाटा संसच्या सूचीबद्धतेची गरज अधोरेखित केली आहे. इतक्या मोठ्या आणि प्रणालीदृष्ट्या महत्त्वाच्या कंपनीने अधिक पारदर्शक आणि मजबूत कॉर्पोरेट गव्हर्नन्स चौकटीत काम करणे आवश्यक असल्याचे संस्थेचे मत आहे.
अंतर्गत मतभेद आले समोर –
टाटा समूहातील अलीकडील घडामोडींमध्ये काही वरिष्ठ सदस्यांना दूर करण्याचे प्रयत्न, नेतृत्वावरील अनिश्चितता आणि ट्रस्ट व्यवस्थापनातील बदल यामुळे अंतर्गत मतभेद अधिक ठळकपणे समोर आले आहेत. नोएल टाटा यांचे पुत्र नेव्हिल टाटा यांची काही ट्रस्टमध्ये नियुक्ती करण्यात आल्यानेही चर्चांना उधाण आले आहे.
उद्याच्या बैठकीत विशेषतः तोट्यातील व्यवसायांवरील दबाव, त्यांची पुनर्बांधणी आणि समूहाच्या भविष्यातील गुंतवणूक धोरणावर सखोल चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.





