“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

Air India Crash । अहमदाबादमध्ये १२ जून रोजी कोसळलेल्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाबाबत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) च्या प्राथमिक चौकशी अहवालात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अहवालानुसार, एअर इंडियाने गेल्या सहा वर्षांत या विमानाचे थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल (TCM) दोनदा बदलले आहे. पहिल्यांदा २०१९ मध्ये आणि दुसऱ्यांदा २०२३ मध्ये बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
थ्रॉटल कंट्रोल मॉड्यूल म्हणजे काय?
टीसीएम ही एक महत्त्वाची उड्डाण प्रणाली आहे. ज्यामध्ये इंधन नियंत्रण स्विच देखील समाविष्ट आहेत. १२ जून रोजी अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इंधन नियंत्रण स्विच अचानक बंद झाल्यामुळे अपघाताच्या तपासात हेच स्विच आता लक्ष वेधून घेत आहेत, ज्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
बोईंगच्या सूचनेनुसार हा बदल Air India Crash ।
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “२०१९ मध्ये बोईंगने जारी केलेल्या निर्देशानंतर टीसीएम बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. एअर इंडियाने या निर्देशाचे पालन केले आणि २०१९ आणि २०२३ मध्ये ड्रीमलायनर विमान व्हीटी-एएनबीचे टीसीएम बदलले.
एएआयबीचा अहवाल काय म्हणतो?
एएआयबीच्या प्राथमिक अहवालात असे नमूद केले आहे की टीसीएम दोनदा बदलण्यात आले होते, परंतु इंधन नियंत्रण स्विचच्या कार्याशी त्याचा थेट संबंध आढळला नाही. तथापि, अपघाताच्या वेळी इंधन नियंत्रण स्विच अचानक बंद होणे हा तपासाचा एक महत्त्वाचा विषय असल्याचेही तपासात म्हटले आहे.
एअर इंडिया अपघाताच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित Air India Crash ।
एअर इंडिया विमान अपघाताबाबतच्या चौकशी प्रक्रियेवर एअरलाइन पायलट्स असोसिएशन ऑफ इंडिया (एएलपीएआय) ने प्रश्न उपस्थित केले आहेत. संस्थेने म्हटले आहे की, सुरुवातीपासूनच तपास पायलटच्या चुकीकडे झुकलेला दिसतो, ज्यामुळे तपास पक्षपाती होऊ शकतो. एएलपीएआयने निष्पक्ष आणि तथ्यावर आधारित चौकशीची मागणी केली आणि कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यापूर्वी तांत्रिक बाबींची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे म्हटले.





