Mahavisitaran : वीजचोरीला ‘एआय’चा शॉक; वापर घटताच महावितरणचा अलर्ट
Mahavisitaran पथक थेट दारात - संशयास्पद मीटरची तत्काळ तपासणी, गैरप्रकार आढळल्यास कारवाई

पिंपरी – वीजचोरी लपविणे आता सोपे राहिलेले नाही. ग्राहकाच्या वीजवापरातील बदल महावितरणची अत्याधुनिक यंत्रणा टिपत आहे. वापर अचानक कमी झाला, मीटरमध्ये संशयास्पद हालचाल झाली किंवा वीजवापराच्या पद्धतीत अनपेक्षित बदल झाला, तर यंत्रणा सतर्क होते.
संशयित ग्राहकाची माहिती थेट भरारी पथकापर्यंत पोहोचते. त्यानंतर पथक संबंधित ठिकाणी जाऊन मीटरची तपासणी करते. त्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांवर आता ‘एआय’ची करडी नजर आहे.
पिंपरी-चिंचवडसह पुणे विभागात वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. ‘थेफ्ट ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टीम’च्या माध्यमातून ग्राहकांच्या वीजवापराचे विश्लेषण केले जाते. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा आधार घेतला जात आहे. ग्राहकाच्या वीजवापराचा पूर्वीचा नमुना या यंत्रणेकडून तपासला जातो.
त्यानंतर सध्याच्या वापराशी त्याची तुलना केली जाते. वापरामध्ये अचानक आणि असामान्य बदल आढळल्यास तो ग्राहक संशयाच्या कक्षेत येतो. मीटरमध्ये फेरफार झाला आहे का, याचीही तपासणी केली जाते. वीजवापरातील अनियमितता, मीटरची स्थिती आणि इतर तांत्रिक बाबींचे विश्लेषण होते. अनेक निकषांवर ही यंत्रणा ग्राहकांच्या वीजवापरावर लक्ष ठेवते.
संशय निर्माण झाल्यानंतर संबंधित ग्राहकाची माहिती भरारी पथकाला मिळते. पथक प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचते. मीटर आणि वीज जोडणीची तपासणी केली जाते. वीजचोरी आढळल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते. आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाईही केली जाते. वीजचोरीचा प्रकार सिद्ध झाल्यास संबंधित ग्राहकावर नियमानुसार दंडात्मक कारवाई होते.
दंडाची रक्कम न भरल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. वीज कायद्यानुसार वीजचोरी हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी दंडासह कारावासाचीही तरतूद आहे. तंत्रज्ञानामुळे वीजचोरीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवणे अधिक सोपे झाले आहे. त्यामुळे अनधिकृत वीजजोडणी, मीटरमध्ये फेरफार किंवा वीजचोरीचा कोणताही प्रकार करू नये. ग्राहकांनी अधिकृत वीजजोडणीचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कारवाईही डिजिटल पद्धतीने
महावितरणने तपासणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा वापर वाढवला आहे. कारवाईदरम्यान घटनास्थळाचे फोटो घेतले जातात. ते मोबाइल ॲपवर अपलोड केले जातात. पंचनामा डिजिटल पद्धतीने नोंदविला जातो.
गैरप्रकार आढळल्यास पुढील कारवाईची नोंदही ऑनलाइन केली जाते. दंडात्मक बिलाची प्रक्रिया आणि त्यानंतरची वसुली याबाबतची माहिती प्रणालीमध्ये नोंदवली जाते. त्यामुळे कारवाईची संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वीजचोरीला आळा घालण्याचा प्रयत्न
वीजचोरीचा थेट परिणाम प्रामाणिक ग्राहकांवर होतो. त्यामुळे वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणकडून तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. पूर्वी संशयावरून होणारी तपासणी आता उपलब्ध वीजवापराच्या नमुन्यांच्या विश्लेषणावर आधारित होत आहे.
वीजचोरी करताना मीटरमध्ये फेरफार करणे किंवा वापर लपविण्याचा प्रयत्न करणे धोकादायक ठरू शकते. अशा प्रकारांवर यंत्रणेकडून लक्ष ठेवले जात आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज जोडणीमध्ये कोणताही अनधिकृत बदल करू नये, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.





