Dagdusheth Ganpati: दगडूशेठ गणपती प्रेम मंदिरात विराजमान
Dagdusheth Ganpati:

मयूर रथातून दिमाखदार मिरवणुकीने आगमन सोहळा
Dagdusheth Ganpati: गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून फुलांनी सजवलेल्या मयूर रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत वृंदावनमधील प्रेम मंदिराच्या कोतवाल चावडी येथे साकारलेल्या प्रतिकृतीमध्ये ‘दगडूशेठ’ बाप्पा विराजमान झाले. या वेळी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.
सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजवलेल्या मयूर रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गंधाक्ष ढोल ताशा पथक, मयूर बँड, प्रभात बँड आणि दरबार बँड मिरवणुकीत सहभागी झाले होते. मुख्य मंदिर, अप्पा बळवंत चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडईमार्गे उत्सव मंडपात मिरवणूक आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. गणेश चतुर्थीला सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी उत्सवाच्या ठिकाणी उत्तरप्रदेश वृंदावन येथील श्री राधावल्लभ मंदिराचे १८ वे तिलकायत अधिकारी श्रीहित मोहितमराल गोस्वामीजी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली.
या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र ऊर्फ बाळासाहेब परांजपे, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आणि आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, विश्वस्त रोहित लोंढे, पराग वांबुरे, राजेंद्र गावडे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
३५ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण Dagdusheth Ganpati:
मंगळवार, दिनांक १५ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३५ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. या वेळी महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले उपस्थित राहणार आहेत. याशिवाय रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत.





