अहमदनगर – विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर जागरण गोंधळ

नगर – विविध विकास कामातील अनियमितता व अतिशय निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करुन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व शासकीय सेवेत राहून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि.५) अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा परिषदेत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. वारंवार कारवाई करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असताना प्रशासनाला जाग आणण्यासाठी सदरचे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे, तालुकाध्यक्ष पप्पू कासुटे, पांडुरंग धरम, संजय कोरडे, पप्पू शेटे आदी सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा, गोरगाव, माळकुप, काळकुप, वारणवाडी, जांबुत येथील जलजीवन मिशन अंतर्गत कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होऊन अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे.
तर श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील कामातही अनियमितता झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.





