अहमदनगर – गाडीखाली चिरडल्या तीन मेंढ्या पायावर गाडी घातल्याने महिला जखमी

संगमनेर – तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुपेकर मळ्याकडे मेंढ्या घेऊन जात असताना नांदूर गावातील सुयोग अशोक करंजेकर याने रस्त्यामधील दोन-तीन मेंढ्या गाडीखाली चिरडल्या. फिर्यादीच्या डाव्या पायावर जोराने गाडी घालून गंभीर जखमी केले. त्यांच्या भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून “तुला कुठे तक्रार द्यायची, ती दे! तुला पाड्यावर येऊन संपून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली.
सखुबाई कारंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेंढपाळ हा त्यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय करतात. मेंढ्या चारण्यासाठी रोज ते नवनवीन गावात जात असतात. शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मेंढ्या घेऊन जांबुत बुद्रुकवरून नांदूर गावाकडे सुपेकर मळ्यात येत होत्या. गावातीलच सुयोग करंजेकर हा गाडी (एमएच 17 इ डब्लू 0758) हिचेवरून साकूरकडून नांदूर गावाकडे येत असताना काही मेंढ्या रस्त्याने जात होत्या. सुयोगला थांबण्यासाठी विनंती केली होती. तरीही त्याने सखुबाईकडे पाहून जाणून-बुजून जोरात गाडी चालवून दोन-तीन मेंढ्यां चिरडल्या आणि सखुबाई यांच्या डाव्या पायावर गाडी घालून गंभीर जखमी केले आहे.
त्यानंतर पुढील उपचारासाठी नांदूर खंदरमाळ येथील एका खासगी रुग्णालयात फिर्यादी बसले होत्या. त्या ठिकाणी पायावर गाडी घालणारा सुयोग करंजेकर, त्याचे वडील अशोक करंजेकर व नातेवाईक अनिल सुपेकर हे तेथे आले. भाऊ रमेश काळे याने त्यांना “गाडी चालवताना दम निघत नव्हता का?” असे विचारले असता याचा राग आल्याने वरील सर्वांनी रमेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तुला कुठे तक्रार द्यायची ती दे, तुला पाड्यावर येऊन संपून टाकीन. अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या सखुबाई कारंडे यांनी घारगाव पोलीस स्टेशन गाठले आणि गुन्हा दाखल केला.





