अहमदनगर – सुपा : वाळवणे रस्त्याचे काम सुरू

पारनेर – सुमारे दहा ते बारा गावची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहरात दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सुपा ते वाळवणे तीन किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. या रस्त्यावर खडी क्रेशरची अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. यामुळे रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले होते. याबाबत दैनिक “प्रभात” ने सडेतोड भूमिका मांडली. वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले. याची बांधकाम विभागाने दखल घेत डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू केले आहे. यामुळे प्रवाशांसह नागरिकांनी “प्रभात” चे आभार मानले आहेत.
सुपा ते वाळवणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. ग्रामीण भागातून शेतात पिकविलेला शेतीमाल मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा, नगर, पारनेर, पुणे याठिकाणी विक्रीसाठी नेण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. यासह शालेय विद्यार्थी, दूध उत्पादक शेतकरी, कंपनी कामगार, व्यावसायिकांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. पावसाच्या पाण्यात अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात झाले. सतत होणाऱ्या अपघातात काहींना कायमचे अपंगत्व आले. तर काही कायमचे जायबंदी झाले. वारंवार मागणी करूनही रस्ता होते नसल्याने वाळवणेच्या सरपंच संगीता गोरक्षनाथ दरेकर, रूईछत्रपतीचे सरपंच मच्छिंद्रनाथ दिवटे व ग्रामस्थ यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.
वाळवणे येथील भैरवनाथ देवस्थान हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेदरम्यान लाखो भाविक याठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात, यासह रूईछत्रपती येथे ग्रामीण रूग्णालय असल्याने उपचारासाठी सुपा, वाळवणे, रायतळे येथील ग्रामस्थांना याच रस्त्याने ये- जा करावी लागते. या रस्त्यावर प्रवास करताना ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. आता मात्र रस्त्याचे काम होणार असल्याने हा प्रवास सुखकर होणार आहे.
वाळवणे रस्त्यालगत दुर्गंधी
सुपा चौकात मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाळवणे रस्त्यावर हार विक्रेते, चिकन सेंटरवाल्यांकडून तसेच स्थानिक रहिवाशांकडून ओला व सुका कचरा टाकला जातो. चौकातून हाकेच्या अंतरावर स्मशानभूमी आहे. येथील पुलावर देखील मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. तसेच वाळवणे खिंड येथेही कचरा टाकला जातो. यामुळे सुपा शहरात प्रवेश करण्याअगोदर नागरिकांना तोंड दाबून शहरात प्रवेश करावा लागतो. ग्रामपंचायतीच्या वतीने घंटा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु येथील स्थानिकांची सवय मोडत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.





