अहमदनगर – समन्यायी पाणीवाटप तत्त्व अमान्य

संगमनेर – समन्यायी पाणीवाटपाविरोधात संगमनेरनेच पहिला आवाज उठवला असून, हे तत्त्व आपल्याला मान्य नाही. निळवंडे धरण व कालव्यांची कामे ही दुष्काळग्रस्तांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठीच पूर्ण केल्याचे प्रतिपादन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ होते. या वेळी व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, सुधाकर जोशी, इंद्रजित थोरात, उत्कर्षा रूपवते, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सुरेश थोरात, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे, हौशीराम सोनवणे, सुनंदा जोर्वेकर, अर्चना बलोडे, निर्मला राऊत, प्रदीप मालपाणी उपस्थित होते.
या वेळी हिराबाई व मीनानाथ वर्पे, सुरेखा व डॉ. तुषार दिघे, लता व माणिकराव यादव, सिंधुताई व संभाजीराव वाकचौरे, मंदा व शेखर वाघ या संचालकांच्या हस्ते विधिवत पूजा झाली. आ. थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे हे आपण दुष्काळी भागातील जनतेसाठीच बांधले आहे. खरे तर मे महिन्यामध्ये दहा टीएमसी पाणी शिल्लक होते. त्यावेळेस सर्व बंधारे, नाले भरून घेता आले असते. मात्र, संगमनेर तालुक्यात साजरा झालेला आनंदोत्सव काहींना पाहावला नाही. त्यावेळेस पाणी बंद केले. डा. सुधीर तांबे म्हणाले की, निळवंडे धरण कोणी केले हे सर्वश्रुत आहे. काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जनता त्यांना ओळखून आहे. ओहोळ यांनी तालुक्यातील विकासाच्या काही लोक आड येत असून, त्यांना बाजूला करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
चांगल्यासाठीच गणेश परिसरात!
सध्या अनेक अडचणी निर्माण करण्याचे काम सुरू आहेत. मात्र, हा तालुका क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांचा आहे. कठीण परिस्थितीला धाडसाने सामोरे जाणार आहोत. सत्ता येते आणि जाते. आगामी काळ हा आपलाच असून, कॉंग्रेसचे सरकार येणार असल्याचे सांगताना आपण कधीही कुणाची वाईट केले नाही. चांगले करण्यासाठीच गणेश परिसरात आपण गेलो आहोत असे आ. थोरात म्हणाले.





