अहमदनगर | निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीतील पिकअप उलटला

नगर – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपुरला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडीतील एक पिकअप गोरक्षनाथ गडावरून परततांना ब्रेक फेल झाल्याने घाटाच्या पहिल्या वळणावर उलटला. त्यामुळे पिक अप मधील असलेले १० ते १५ भाविक किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवार (दि. १) रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरञान घडली.
बाळासाहेब रंगनाथ खोपसे, संभाजी नासाहेब हरगुडे, भाऊसाहेब जगताप, नवनाथ तांबे, (रा. ता. श्रीरामपूर) असे किरकोळ जखमी झालेल्या भाविकांचे नाव आहे. जखमींना तत्काळ उपचारासाठी नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरहून पंढरपुरला निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी व दिंडी नगर तालुक्यातील डोंगरगण येथे सोमवारी (दि.१) मुक्कामी येणार होती. त्यातील दिंडीतील काही भाविक मांजरसुंबा येथील श्री क्षेत्र गोरक्षनाथ गडावर दर्शनासाठी गेले होते. दर्शनाहून परततांना घाटातील पहिल्या वळणावर पिकअपचे ब्रेक फेल झाल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती माहिती समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक माणिक चौधरी, गावातील उपसरपंच जालिंदर कदम, ग्रामस्थ सागर कदम, विक्रम कदम, सागर वाघमारे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी रुग्णवाहीका बोलविण्यात आल्या. जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात १० ते १५ भाविक किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.





