प्रभात वृत्तसेवा खालापूर – संतांनी दिलेला अध्यात्मिक वारसा कोकणात आजही मजबूत आहे. आळंदी येथे माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी समस्त वैष्णवांचा मेळावा भरणार असून वारकरी मंडळींचा आदरतिथ्यासाठी खोपोली नगरपालिका, पोलीस प्रशासन सह विविध राजकीय, सामाजिक संस्था, मंडळे आनंदाने समाविष्ट होत आहेत.दरवर्षाप्रमाणे याही वर्षी कोकणातील वारकरीही मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. खालापूर तालुका सहित संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या दिंड्या मागील दोन तीन दिवसांपासून खोपोलीत विश्रांती घेऊन पुढे माऊलींच्या गावाला निघत आहेत.खोपोली मुक्कामी आलेल्या सर्वच वारकरी दिंड्याचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे आणि माजी उपनगराध्यक्ष कुलदिपक शेंडे मित्र परिवाराने स्वागत करीत चहापानाची व्यवस्था बोरघाटात केली आहे. कोकणातून येणाऱ्या सर्व दिंड्या एकाच ठिकाणी राहण्यासाठी सभामंडप उभारून शौचालयासह सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प असल्याचे माजी उपनराध्यक्ष कुलदिपक शेंडे यांनी बोलताना सांगितले. माऊलीच्या गावी जावून मनोभावे भक्ती व दर्शन घेण्यासाठी रायगड मधील दीडशेच्यावर पायी दिंड्या व हजारो वैष्णवांनी खोपोलीला मुक्काम करुन आळंदीच्या दिशेने हरिनामाचा गजर करीत मार्गक्रमण सुरु केले आहे. यात खालापूर तालुक्यातील प्रमुख दिंड्यांच्या माध्यमातून दहा हजारांहून अधिक वारकरी आहेत. माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे संचलित भैरवी शिक्षण विकास संस्था मुळगाव व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी दरवर्षाप्रमाणे दिड्यांचे स्वागत करून चहापानाची व्यवस्था केली होती. दरवर्षी शेंडे कुटंबीय दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी चहापानाची व्यवस्था करतात. रामदास शेंडे आणि कुलदिपक शेंडे यांचे श्रीफळ देऊन सन्मान केला. मी नगराध्यक्ष असताना पुण्यात गेलो होतो. त्यावेळी वाकरऱ्यांसाठी व्यवस्था आणि स्वागत पाहून आपण कोकण दिंडीचे खोपोली स्वागत केले पाहिजे अशी संकल्पना 30 वर्षापूर्वी केली होती. आजही ती परंपरा चालू असून कुलदिपक आणि केतन दोघंही ती परंपरा कायम ठेवत सहभागी होतात याचा मनस्वी आनंद आहे, असे रामदास शेंडे यांनी सांगितले.