अहमदनगर: ग्रामीण भागात योग्य मार्गदर्शन काळाची गरज – डॉ. अशोकराव ढगे

नेवासा – गेवराई (ता.नेवासा) येथील विकास कर्डिले यांनी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमिशन मार्फत उपजिल्हाधिकारीपदी अकरावा नंबर मिळून यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार कृषी खात्याच्यावतीने कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मंडल कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी कृषी पर्यवेक्षक लक्ष्मणराव सुडके व विकास कर्डिले यांचे वडील व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. ढगे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक पातळी उत्तम आहे. तथापी ज्या मुलांना चांगले मार्गदर्शन मिळते ते आज महाराष्ट्र पातळीवर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चांगले यश संपादन करीत आहे. यासाठी अभ्यासिका वर्ग चालवून त्या ठिकाणी विविध विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून देणे ही काळाची गरज आहे. आज जागतिक पातळीवर अभ्यासले असता भारत सर्व जगभर मेंदू निर्यात करत आहे म्हणजे उत्तम शैक्षणिक गुणवत्ता व बौद्धिक पातळी असलेले विविध क्षेत्रातील तज्ञ जगभर पसरले आहेत.
खरोखर याचा अभिमान वाटतो तथापी ही मोहीम ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारित करणे आवश्यक आहे, असे यावेळी डॉ.ढगे यांनी बोलतांना सांगितले. या कार्यक्रमाचे सुञसंचालन कृषी सहाय्यक वैभव कदम यांनी केले तर संदीप गायकवाड यांनी सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त केले.





