अहमदनगर | आमदार तनुपरे, बाजार समितीसमोर लाक्षणिक उपोषण

राहुरी | महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती महाराजांंचा पुतळा कोसळला हा काळा दिवस म्हणावा लागेल. याप्रकरणी केवळ शिल्पकार व कंत्राटदार यांचेवर गुन्हा दाखल होऊन काम भागणार नाही. याप्रकरणी जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.
राहुरीत बाजार समितीसमोर आयोजित उपोषण प्रसंगी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आ. तनपुरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने दिवसभर लाक्षणिक उपोषण झाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्याहस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषणाची सांगता झाली.
आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले, पुतळा पडला ही विटंबनाच झाली. आमच्या सर्वांच्याच भावना दुखावल्या आहेत. भ्रष्टाचारी यंत्रणेमुळे राज्याची मान शरमेने खाली गेली. खरे तर हा राजकारणाचा विषय नाही. पण लोकशाहीत भावना व्यक्त केल्या पाहिजेत. म्हणून उपोषण करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याऐवजी सारवासारव करतात. ते आपली जबाबदारी विसरलेत.
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नाव सर्वसाधारण सभेत ठराव संमत झाल्यावर बदलले गेले. अर्धवट माहितीवर आपल्यावर टीका केली. विविध संघटना, व्यक्ती यांनी उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी लोणी येथील प्रतिभा घोगरे यांनी सरकारवर कडाडून टीका केली. उपोषण स्थळी समितीचे सभापती अरुण तनपुरे, बाबासाहेब भिटे, शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे, सुरेश वाबळे, विजय डौले, सागर तनपुरे, आप्पासाहेब ढूस, किरण कडू, सुरेश निमसे, ज्ञानेश्वर बाचकर आदी उपस्थित होते. रामदास बाचकर, निलेश जगधने, दादासाहेब मुंडे, बाबासाहेब भिटे, रवींद्र आढाव, दत्तात्रेय कवाणे, सुनील आडसुरे, शिवरत्न शेटे, हसन सय्यद, एम. डी. सोनवणे, मिलींद अनाप, रामेश्वर सोनवणे, सचिन बोरुडे आदींची यावेळी भाषणे झाली.





