अहमदनगर – शाळा, महाविद्यालय परिसरातील टपऱ्यांवर हातोडा

नगर -सामाजिक कार्यकर्ते व सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावरील प्राणघातक हल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने अतिक्रमणविरोधी विशेष मोहिम हाती घेतली असून शाळा,महाविद्यालयांसमोरील गुटखा, मावा,तंबाखू विकणाऱ्या टपऱ्यांवर हातोडा टाकला आहे. तसेच अनधिकृत लावलेले फ्लेक्स बोर्डही हटविले आहेत.
नगर शहर व उपनगर परिसरात महापालिकेने गुरुवारी व शुक्रवारी अनधिकृत फलकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. या दोन दिवसात महापालिकेने छोटे मोठे 72 फलक कारवाई करून जप्त केले आहेत.तसेच, दुकानांचे अडथळा ठरणारे 17 फलकही कारवाई करून जप्त केले आहेत. विविध पक्ष व इतरांनी लावलेले 15 झेंडेही काढून घेण्यात आले आहेत. कारवाईत चित्रा टॉकीज परिसर व तारकपूर येथील दोन मटक्याच्या टपऱ्या महापालिकेने कारवाई करून हटवल्या आहेत.
आयुक्त पंकज जावळे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण निर्मूलन विभाग व प्रभाग समिती कार्यालयामार्फत गुरुवारपासून मोहीम राबवण्यात आली. मध्य शहर, सावेडी उपनगर, कोठला परिसर, डीएसपी चौक, पत्रकार चौक, प्रोफेसर चौक, दिल्लीगेट अशा विविध ठिकाणी पथकांनी अनधिकृत फ्लेक्स बोर्ड, दुकानांचे फलक, झेंडे कारवाई करून हटवले. अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख अनिकेत बल्लाळ, क्षेत्रीय अधिकारी रिझवान शेख, प्रभाग अधिकारी राकेश कोतकर, मेहेर लहारे, संजय उमाप, क्षेत्रीय अधिकारी अर्जुन जाधव,नितीन इंगळे यांनी पथकासह कारवाई करून साहित्य जप्त केले.
गुरुवारी सायंकाळी प्रोफेसर चौकात लावण्यात आलेले सभेचे फलक मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काढले होते. त्या फलकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो होता.फलक काढताना कर्मचाऱ्याने या फोटोचा अवमान केला. शिवप्रेमींच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी महापालिकेचे कर्मचारी सागर जपकर यांच्यावर कुणाल भंडारी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना शिंदे गट, भाजप, बजरंग दल, हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते व मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सीताराम सारडा विद्यालय येथील हनुमान पान स्टॉल या दुकानाचा परवाना रद्द करण्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. अक्षय सब्बन याच्या मालकीची असलेली ही टपरी महापालिकेने कारवाई करून हटवली होती. मात्र, हीच टपरी जवळच असलेल्या एका इमारतीच्या गाळ्यात ठेवून व्यवसाय सुरू आहे व तोही शाळेपासून शंभर मीटर अंतराच्या आत असल्याचे कुलकर्णी यांनी निदर्शनास आणले आहे.





