अहमदनगर : आजही करोना रुग्णवाढ 4 हजार पार

अहमदनगर : अहमदनगरमध्ये येत्या 10 मेपर्यंत नगरमध्ये बहुतेक अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात आलेल्या आहेत. मात्र, अशा काळातही नगर शहर व जिल्ह्यातील करोना रुग्णवाढ अत्यंत चिंताजनक आहे. आजही करोनाबाधित रुग्णवाढ 4 हजार पार झाल्याने ही चिंता कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
राज्यात येत्या 15 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. 15 मे नंतर सरकारकडून काय निर्णय घेतला जाईल, याबाबत अजून काहीच संकेत मिळत नाहीत. मात्र, लॉकडाऊन उघडल्यानंतर लोक घराबाहेर पडतील. त्यावेळची रुग्णवाढ कशी असेल? अशी काळजी आता सगळीकडे व्यक्त होताना आहे.
आज तब्बल 4 हजार 139 नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. हीच रुग्णसंख्या काल 4 हजार 475 पर्यंत पोचली होती. आज रुग्णवाढ थोडी कमी झाली असली, तरी ती पुन्हा कधी उफाळून येईल, याचा नेमच राहिलेला नाही. दरम्यान, आता नगर जिल्ह्यात ऑक्सीजनची उपलब्धता बर्यापैकी होत असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, जिल्ह्यातील बेड्सची संख्या कोणत्याही परिस्थितीत वाढवावीच लागेल, अशी स्थिती आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आजच तशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
याशिवाय प्रत्येक तालुक्यांसाठी 100 ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारीस्तरावर त्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयासाठी प्रत्येकी दोन ड्युरा सिलींडरचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे. ऑक्सीजन निर्मितीच्या 12 प्रकल्पांना आता मंजूरी मिळाली आहे. त्यांचेही काम लवकरच सुरु होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने आज करोना आढावा बैठकीत विभागीय आयुक्तांना दिली.
दरम्यान, जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींच्याही आरटीपीसीआर चाचण्या होणे गरजेचे आहे. एका करोनाबाधित रुग्णामागे किमान 20 व्यक्तींच्या चाचण्या करायला हव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेल्या आहेत.





