Irfan Sheikh : १२ जून रोजी अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत पिंपरी चिंचवड येथील एअर इंडियाचा क्रु मेम्बर इरफान शेख याचा देखील मृत्यू झाला होता. आज सकाळी सात वाजता पुणे विमानतळावर इरफानचे शव आणण्यात आले. तिथून राहत्या घरी त्याचा मृतदेह नेण्यात आला. दुर्घटनेच्या दहाव्या दिवसानंतर आज सकाळी साडेनऊ वाजता इरफानला अखेरचा निरोप देत दफनविधी करण्यात आला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. या दुर्घटनेत इरफानचा देखील मृत्यू झाला होता. यामुळे त्याच्या वडिलांचे रक्ताचे नमुने डीएनए रिपोर्टसाठी घेण्यात आले होते. नवव्या दिवशी अर्थात शुक्रवारी त्याचा डीएनएन मॅच झाला. त्यानुसार त्याचे शव आज पुणे विमानतळावर आणण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, इरफान शेख हा पिंपरी चिंचवड येथील संत तुकाराम नगरचा रहिवाशी होता. तो एअर इंडियाच्या डोमेस्टिक क्रू आणि नंतर इंटरनॅशनल क्रू या पदावर कार्यरत होता. नुकताच तो ईदसाठी घरी ही येऊन गेला होता. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंब, नातेवाईकांवर मोठा धक्का बसला आहे. त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळावू असल्याने मित्रपरिवारातून दुःख व्यक्त करण्यात आले आहे. आई मी लवकरच परत येईल प्रत्येक वेळी इरफान कुठलं ही विमान उड्डाण घेण्याआधी तो आईशी फोनद्वारे बोलायचा. घटनेच्या दिवशीही त्याचे आईसोबत फोनद्वारे बोलणे झाले होते. आई, लवकरच परत येतो, अशी त्याची शेवटची ओळ होती. त्याचे आईवर खूप प्रेम होते. आई-वडिलांना एकदा तरी फिरायला घेऊन जाई, ही इच्छा नेहमी बोलून दाखवणाऱ्या इरफान शेखची ती अंतिम इच्छा अपूर्णच राहिली. हेही वाचा : “देशात अस्थिरता वाढत असताना योग शांततेचा मार्ग दाखवू शकतो,” विशाखापट्टणममधून PM मोदींचा संदेश