Ahmedabad Plain Crash : टेकऑफच्या काही सेकंदातच दोन्ही इंजिन बंद? अहमदाबाद विमान अपघाताचा एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर

नवी दिल्ली : मागील महिन्यामध्ये अहमदाबाद येथे भीषण विमान अपघात झाला होता. एअर इंडियांचे एक विमान उड्डाण घेतल्यानंतर लगेचच कोसळले होते. यामध्ये जवळपास 270 हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. विमानाच्या भयानक अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल समोर आला आहे. या अहवालामध्ये विमानाने उड्डाण घेताच त्याचे इंजिन अचानक बंद झाले असा रिपोर्ट आला आहे. त्यामुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. याचा अर्थ असा की दोन्ही इंजिन टेकऑफच्या काही सेकंदातच बंद पडले, अशी धक्कादायक माहिती अहवालातून समोर आली.
एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी)ने जारी केलेल्या अहवालात नोंदवलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डिंगवरून असे दिसून आले की, टेकऑफच्या वेळी एका पायलटने एका सहकाऱ्याला विचारले, तुम्ही इंधन का कमी केले? उत्तरात, दुसऱ्या पायलटने म्हटले, मी हे केले नाही. यावरून हे स्पष्ट होते की पायलटने इंधन बंद केले नव्हते. यामुळे दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ एकाच वेळी कसे झाले असा प्रश्न उपस्थित होतो. इंजिन १ आणि इंजिन २ यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर इंजिन बंद झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
08:08:42 यूटीसीला विमानाने १८० नॉट्सचा कमाल वेग गाठला. फक्त एका सेकंदात, दोन्ही इंजिनांचे इंधन कटऑफ स्विच ‘रन’ वरून ‘कटऑफ’ स्थितीत हलवले. वैमानिकांनी ताबडतोब दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला आणि रिलाईट प्रक्रिया देखील सुरू झाली. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. परिणामी विमान 08:09:11 यूटीसी वाजता क्रॅश झाले, असे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.
या अहवालावर एअर इंडियाच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन प्रतिक्रिया दिली आहे. तपास अजून सुरु असल्याचे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे. पुढे त्यांनी लिहिले आहे की, एअर इंडिया एआय171 अपघातामुळे बाधित झालेल्या कुटुंबांसोबत आणि त्यांच्यासोबत एकजुटीने उभी आहे. आम्ही या नुकसानाबद्दल शोक व्यक्त करत आहोत आणि या कठीण काळात मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत.
एअर इंडिया नियामकांसह भागधारकांसोबत जवळून काम करत आहे. आम्ही एएआयबी आणि इतर अधिकाऱ्यांशी त्यांचा तपास पुढे जात असताना पूर्ण सहकार्य करत आहोत. तपासाचे सक्रिय स्वरूप पाहता, आम्ही विशिष्ट तपशीलांवर भाष्य करण्यास आणि अशा सर्व चौकशी एएआयबीकडे पाठवण्यास असमर्थ आहोत, अशी भूमिका एअर इंडियाने घेतली आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्समधील माहिती संकलित करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि सर्व पुराव्यांचा अभ्यास करून एएआयबीने एका महिन्यात प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सर्व गोष्टी अद्याप स्पष्ट झाल्या नसल्या तरी अंतिम अहवालात आणखी स्पष्टता येऊ शकेल. पुढच्या चौकशीतून खूप काही गोष्टी समोर येतील. त्यामुळे यावर आताच काही अधिक बोलता येणार नाही.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री




