अहमदनगर – रब्बीचा बोजवारा; पिकांची आशा झाली धूसर..!

नगर -रतीच्या पावसाने दिलेला दगा आणि टंचाईसदृष्य परिस्थिती याचा मोठा परिणाम रब्बी हंगामीतील पिकांच्या पेरण्यावर दिसत आहे. कृषी विभागाच्या अहवालानूसार राहुरी, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यात रब्बीच्या पेरण्याची गती अत्यंत संथ असून जामखेड, पारनेर, नगर आणि कर्जत तालुक्यात पेरण्याचा वेग बरा आहे. मात्र, यात देखील ज्वारी वगळता अन्य पिकांची पेरणी नगण्य असल्याने यंदा रब्बीच्या पिकांची अशा धूसर दिसत आहे.
जिल्ह्यात चालू वर्षी पावसाची स्थिती सुरूवातीपासून बिकट होती. सुरूवातीच्या पावसाने हुलकावणी दिल्यानंतर साधारण दोन महिन्यांचा मोठा खंड देखील पडला. यामुळे खरीप हंगामातील पिकांवर त्याचा मोठा विपरित परिणाम होवून शेतकऱ्यांची उभी पिके करपली. यामुळे जिल्ह्यात सुमारे 11 लाखा पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांपैकी 9 लाखांहून अधिक शेतकरी खरीप पिक विम्याच्या अग्रामीसाठी पात्र ठरले. जिल्हाधिकारी सिध्दीराम सालिमठ यांनी याबाबतची अधिसुचना काढून विमा कंपन्यांना शेतकऱ्यांना एकूण भरपाईच्या 25 टक्के भरपाई करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानूसार भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची भिस्त परतीच्या पावसावर होती. मात्र, परतीच्या पावसाने दगा दिल्याने जिल्ह्यातील शेतीचे चित्र विचित्र झाले आहे. आतपासून अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यांच्या गतीवर ते स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात समाधानकारक पाणी साठा असला तरी जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश झालेले असल्याने जोपर्यंत पाण्याचे आवर्तन सुटणार नाही, तोपर्यंत अनेक ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम राहणार आहे.
या तालुक्यात अत्यंत कमी पेरणी
राहुरी, नेवासा, कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले, संगमनेर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा आणि राहाता तालुक्यात अत्यंत कमी पेरणी झाली असून यातील बहुतांशी तालुके हे पाट पाण्यावर अवलंबून असणारे आहेत. दुसरीकडे नगर आणि पारनेर तालुक्यात 100 टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे असून या ठिकाणी अनेक गावात पेरण्याची स्थिती गंभीर आहे.
पेरणी अहवाल
कृषी विभागाच्या अहवालानूसार जिल्ह्यात गव्हाची 5 हजार हेक्टरवर अवघी 7 टक्के, ज्वारीची 50 टक्के 1 लाख 35 हजार, मका 10 हजार हेक्टर 65 टक्के, हरभरा 1 लाख 40 हजार हेक्टर 40 टक्के आदी पिकांची पेरणी झालेली आहे.





