Shirur News: दुरुस्ती होणार की पाणी संपणार? टाकळी हाजी बंधाऱ्यातील गळतीने शेतकरी चिंतेत

प्रभात वृत्तसेवा
टाकळी हाजी – घोड नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे समोर आले आहे. या गळतीमुळे बंधाऱ्यातील पाणी साठा वेगाने कमी होत असून, उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच परिसरात पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.टाकळी हाजी आणि परिसरातील शेती प्रामुख्याने घोड नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.
सध्या कांदा, गहू आणि भाजीपाला यांसारखी रब्बी पिके अंतिम टप्प्यात असून त्यांना पाण्याची मोठी गरज आहे. मात्र, बंधाऱ्याच्या भिंतींना तडे गेल्याने पाणी वाया जात असून याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गळतीमुळे पाणी पातळी घटल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या गंभीर समस्येबाबत कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगावचे कार्यकारी अभियंता जी. बी. नान्नोर आणि मंचर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डी. एस. कोकणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
तसेच कुकडी कालवा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश वायसे यांनी या प्रश्नी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन मौल्यवान पाणी वाचवावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.





