Satara News : गारळेवाडीत अहिल्याबाई होळकर जयंती जल्लोषात साजरी

कलेढोण (ता. खटाव) : गारळेवाडी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात आणि सन्मानाने साजरी करण्यात आली. त्यांच्या समाजकार्यास व आदर्श नेतृत्वाला श्रद्धांजली वाहत, नव्या पिढीस प्रेरणा देणारा हा सोहळा संपूर्ण गावाने एकत्र येऊन साजरा केला.
या कार्यक्रम प्रसंगी गावातील यशस्वी महिलांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत तसेच वैद्यकीय व इतर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पूजा विकास गारळे व डॉ.माधवी हांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच गारळेवाडी ग्रामपंचायत स्थापना (१९७२) झाल्यापासून निवडून दिलेल्या सरपंच, उपसरपंच, व सदस्य झालेल्या माजी महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये माजी सरपंच व सदस्य रुक्मिणी पोपट गारळे, वैशाली गारळे, मंगल डोंबाळे, मालन गारळे, कलावती गारळे, यशोदा गारळे, इंदाबाई गारळे, कमल देवकते, रुक्मिणी गारळे, वंदना मदने, कमल गारळे, अक्काताई मदने, राणीताई गारळे, आदी ग्रा.प. सदस्य व पदाधिकारी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प प्रदान करून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. गावातून गजी, ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली, ज्याने संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे हे होते. तसेच विद्यमान सरपंच अनिल गारळे, उपसरपंच कमल देवकते प्रसिध्द उद्योजक मारुती शेठ गारळे, माजी सरपंच पोपट शेठ गारळे, धनाजी रामचंद्र गारळे, पोलिस पाटील धनाजी गारळे, सचिन गारळे, प्रशांत सरगर, अर्जुन गारळे व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चंद्रकांत हूलगे यांनी केले.





