Agriculture Crisis: ‘सांग सांग भोलानाथ…’ लहानपणीची कविता आठवून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी…पाहा धक्कादायक वास्तव
Agriculture Crisis: पावसाअभावी वाई तालुक्यात मशागतीची कामे ठप्प; पेरण्या लांबल्याने खरिपाचा हंगाम धोक्यात.

Agriculture Crisis – ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’ लहानपणी पावसाची आळवणी करणारी ही कविता आज वाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. मृग नक्षत्र कोरडे गेले आषाढ उजाडला तरी आभाळात केवळ ढगांची गर्दी दिसत आहे. मात्र, पाऊस हुलकावणी देत असून यंदा ‘एल निनो ’ प्रभावाचे सावट थेट शेतकरी वर्गाच्या चुलीवर आणि शेतकऱ्यांच्या शेतावर पडताना दिसत आहे.
दरवर्षी या दिवसात हिरवाईने नटणारा आणि ट्रॅक्टरच्या आवाजाने गजबजणारा हा परिसर पावसाअभावी सुन्न आणि शांत आहे. वाई तालुक्यात यंदा मान्सूनने अद्यापही अपेक्षित जोर धरलेला नसल्याने बळीराजा चिंतेत सापडलेला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येत आहेत. मेघ गर्जना,
विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांचा जोर अनुभवायला मिळत असला तरी प्रत्यक्षात केवळ तुरळक ठिकाणी हलकासा पाऊस पडत असल्याने शेतीला त्याचा कोणताही फायदा होत नाही. खरीप हंगामाची सुरुवात होऊनही समाधानकारक पाऊस नसल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीची तयारी पूर्ण केली असली तरी पावसाअभावी पेरणी करण्याचं धाडस कोणीही करताना दिसत नाही.
परिणामी खरीप हंगाम दिवसेंदिवस लांबणीवर पडत असून शेतकरी अक्षरशः चातकाप्रमाणे आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. वाई तालुक्यात काही भागात हलका पाऊस झाला असला तरी तो केवळ धूळ बसवण्यापुरता ठरला आहे. शेतजमिनींना ओलावा मिळत नसल्याने खरीप पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक परिस्थिती निर्माण झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्थव्यवस्थाही धोक्यात
मान्सून नेमका कधी सक्रिय होणार आणि बळीराजाच्या कोरड्या पडलेल्या शिवाराची तहान कधी भागवणार याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस झाला तरच खरीप हंगामाला गती मिळणार आहे. अन्यथा खरीप पेरणी आणखी लांबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मान्सूनने दिलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे वाई तालुक्यावर दुष्काळाचे गडद सावट निर्माण झाले आहे. वाढत्या उन्हामुळे जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत.
आणि त्यासोबतच शेतकऱ्यांच्या काळजाला ही चिंतेचे विदारक चरे पडत आहेत. घरची लेकरं भुकेली राहू नयेत म्हणून रात्रंदिवस मातीशी इमान राखणारा शेतकरी आज स्वतः निसर्गापुढे हतबल झाला आहे. बँकेचे कर्ज, कौटुंबिक जबाबदारी आणि डोक्यावर कोसळलेला हा संकटाचा डोंगर कसा पेलावा या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ शेतीच नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.





