Rain Update : आला रे आला! पुणे, सातारा, कोकणात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाला मोठा दिलासा
Rain Update : गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे चिंतेत असलेल्या महाराष्ट्राला अखेर वरुणराजाने मोठा दिलासा दिला आहे.

Rain Update : अखेर राज्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे, सातारा, भिवंडी, रत्नागिरी, महाड आणि कोकणातील विविध भागांमध्ये रविवारी पावसाने जोरदार किंवा रिमझिम स्वरूपात हजेरी लावली. (Rain Update)
पुण्यात मुसळधार पाऊस, अनेक भाग जलमय
पुणे शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानंतर सायंकाळी मुसळधार पाऊस कोसळला. हडपसर, सिंहगड रोड, कात्रज, कोंढवा, कोथरूड या भागांत जोरदार सरी बरसल्या. पहिल्याच पावसात स्वारगेटमधील मित्र मंडळ चौकात पाणी साचल्याने काही भाग जलमय झाले. पिंपरी-चिंचवडमध्येही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. (Rain Update)
साताऱ्यात विजांच्या कडकडाटासह दमदार एन्ट्री
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. परळी खोऱ्यात मुसळधार पावसामुळे शेतीच्या मशागतीच्या कामांना गती मिळणार असून पेरणीपूर्व तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Rain Update)
भिवंडीकरांना उकाड्यातून दिलासा
भिवंडीत अचानक पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठांमध्ये काही काळ धावपळ उडाली. तर अनेक नागरिक आणि तरुणांनी पहिल्या पावसाचा आनंदही लुटला. (Rain Update)
रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये पावसाचे आगमन
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये तब्बल 10 ते 15 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. (Rain Update)
महाडमध्येही कोसळला जोरदार पाऊस
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणानंतर अखेर जोरदार पाऊस झाला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला. (Rain Update)
पावसासाठी जांभळेश्वराला जलाभिषेक
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून लांबल्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. खेड येथे सकल हिंदू समाज आणि शिवभक्त समितीच्या वतीने जांभळेश्वर महादेवाला जलाभिषेक करून लवकर पाऊस पडावा, अशी प्रार्थना करण्यात आली. धार्मिक विधीनंतर विविध देवतांच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. (Rain Update)
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
गेल्या काही आठवड्यांपासून पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या आणि शेतीची कामे आता वेग घेण्याची शक्यता आहे. अनेक भागांत पडलेल्या या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत असून, पुढील काही दिवसांत मान्सून अधिक सक्रिय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Rain Update)






