युक्रेन – अमेरिकेत व्यापक आर्थिक सहकार्याबद्दल सहमती; दुर्मिळ खनिज संपत्ती मिळणार अमेरिकेला

किव्ह – अमेरिका आणि युक्रेन दरम्यान व्यापक आर्थिक सहकार्याच्या करारावर प्राथमिक सहमती झाली आहे. यानुसार युक्रेनमधील दुर्मिळ खनिज संपत्ती अमेरिकेला उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे युक्रेनचे पंतप्रधान डेन्यास श्मिशाल यांनी सांगितले. अनेक दिवस चाललेल्या वाटाघाटींनंतर युक्रेन आणि अमेरिकेमध्ये या संदर्भातल्या प्राथमिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात येणार आहेत.
मात्र या कराराचा तपशील अजून निश्चित व्हायचा आहे. खनिज संपत्तीच्या बदल्यात युक्रेनला हवी असलेल्या सुरक्षा विषयक हमीचा देखील तपशील अजून निश्चित होणे बाकी आहे, असे श्मिशाल यांनी युक्रेनच्या सार्वजनिक टेलिव्हिजनवर सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेंव्हापासूनच ते युक्रेनला रशियापासून रक्षण करण्यासाठी अमेरिकेकडून देण्यात येणाऱ्या अब्जावधी डॉलरच्या आर्थिक मदतीच्या मोबदल्याची मागणी करत होते. युक्रेनला युद्धात मदत करण्याचे अमेरिकेचे पुर्वीचे धोरण ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यावर अचानक सोडून दिले.
याशिवाय रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना एकटे पाडण्याचे धोरण देखील त्यांनी सोडून दिले. यामुळे युरोपातील मित्र देशांना अमेरिकेकडून मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल शंका उत्पन्न व्हायला लागली होती. या सर्व घडामोडींमुळे या युद्धामुळे भूराजकीय समिकरणे बदलण्याला अचानक वेग मिळाला आहे. प्राथमिक करारात युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी गुंतवणूक निधीच्या अटी आणि शर्ती निश्चित केल्या आहेत, असे श्मिशाल म्हणाले.
या करारावर लवकरात लवकर शुक्रवारी स्वाक्षरी होऊ शकते आणि ट्रम्प यांना भेटण्यासाठी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी वॉशिंग्टनला जाण्याची योजना आखली जात आहे, असे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.





