‘अग्निवीर योजना म्हणजे देशाच्या सुरक्षेशीच खेळ’; मल्लिकार्जून खर्गे यांचा पुन्हा मोदींवर निशाणा

Agniveer Yojana | Mallikarjun Kharge – ‘चार वर्षांच्या कंत्राटी स्वरूपाच्या लष्कर भरतीसाठी मोदी सरकारने जी अग्निपथ योजना सुरू केली आहे तो थेट राष्ट्रीय सुरक्षेशीच खेळण्याचा प्रकार असून त्यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे’ अशी टीका काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे.
इंडिया आघाडीचे सरकार सततेवर आल्यानंतर ही योजना तातडीने रद्द केली जाईल असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. अग्निपथ योजना लागू झाल्यानंतर तरूणांचे लष्कर भरतीचे आकर्षण कमी झाले आणि लष्कर भरतीकडील युवकांचा प्रवाह कमी झाला असेही कॉंग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘अग्निवीर योजना लादून मोदी सरकारने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ केला आहे. आमच्यासमोर तीन प्रश्न आहेत, ज्यांचे समर्पक उत्तर जनता आता निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपला देईल,असेही खर्गे यांनी म्हटले आहे.
त्यांनी सरकारला विचारले आहे की, अग्निपथ योजनेमुळे दरवर्षी होणारी ७५ हजारांची जवान भरती आता ४६ हजारावर आली आहे हे खरे नाही का? देशाच्या संरक्षणमंत्र्यांना वारंवार सांगावे लागत आहे की अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करू,आणि त्यात बदल व सुधारणा करू? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
लष्कर भरतीत घट होत असल्याबद्दल लष्करी व्यवहार विभाग (डीएमए) आणि लष्कर चिंतेत आहेत हे खरे नाही का? असा प्रश्नही खर्गे यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, एकीकडे देशाच्या सीमांना चिनी घुसखोरी, अनधिकृत कब्जा आणि अतिक्रमणाचा सामना करावा लागत आहे,
त्यासाठी अधिक लष्करी बळाची गरज आहे, तर दुसरीकडे मोदी सरकारने अग्निपथ योजनेद्वारे आमच्या देशभक्त तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे.पण आम्ही ही योजना रद्द करून आमच्या देशभक्त तरूणांना न्याय देऊ असेही खर्गे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
सरकारने जून २०२२ मध्ये अग्निपथ भरती योजना सुरू केली आणि लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये, केवळ चार वर्षांच्या करारावर ही जवानांच्या नियुक्तीची योजना सुरू केली. यात चार वर्षानंतर जवानांना पेन्शनचीही तरतूद नाही,
तसेच जर या चार वर्षात सेवा करताना एखाद्या जवानाचा मृत्यू झाला तर त्याला शहीदाचाही दर्जा दिला जाणार नाही. तसेच अग्निवीर जवानांना लष्कराची कॅन्टीन सेवाही उपलब्ध असणार नाही त्यामुळे तरूणांचा या भरतीकडे असलेला ओढा कमी झाला आहे.





