पुणे | अग्रवाल दाम्पत्यासह सहा जणांना दणका

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “कल्याणीनगर अपघाताच्या घटनेत जीव गमावलेल्या दुचाकीस्वार तरुण-तरुणीचे रस्त्यावर पडलेले रक्ताचे थेंब सुकण्यापूर्वीच आरोपींनी मध्यरात्री पैशांच्या प्रभावाने पुराव्यांसोबत छेडछाड सुरू केली. त्यामुळे आरोपींना जामीन दिल्यास पुन्हा एखादी “मोडस ऑपरेंडी’ वापरून साक्षीदार व पुराव्यांसोबत छेडछाड होण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.
परिणामी मृत व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय व समाज न्यायापासून वंचित राहू शकतो. अशा गंभीर प्रकरणांत आरोपींना जामीन दिल्यास सामाजिक विवेकाला धक्का बसून समाजात चुकीचा संदेश जाईल,’ असे निरीक्षण नोंदवित विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी “रक्ताच्या नमुन्यात फेरफार’ प्रकरणात अग्रवाल दाम्पत्यासह ६ जणांचे जामीन फेटाळले. त्यामुळे या आरोपींना येरवडा कारागृहातच राहावे लागणार आहे.
कल्याणीनगर येथे १८ मे च्या मध्यरात्री अल्पवयीन कारचालकाने पोर्श कार भरधाव चालवून धडक दिल्याने दुचाकीस्वार अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता.
या अपघातानंतर अल्पवयीन चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल, पत्नी शिवानी अग्रवाल या दाम्पत्यासह ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे, आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यावर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर विशेष न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी सरकार आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
या संदर्भात विशेष न्यायाधीश मुधोळकर यांनी दिलेल्या ४५ पानांच्या आदेशात बचाव पक्षाने सादर केलेल्या विविध न्यायनिवाड्यांचा परामर्ष घेतला आहे, तसेच आरोपींनी केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विविध निरीक्षणे नोंदविली आहेत.
न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे
– अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत बेपर्वाईने पोर्श कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने तरुण-तरुणीचा मृत्यू झाला.
– मुलगा मद्यधुंद असल्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी अग्रवाल दाम्पत्य, डॉ. हाळनोर, डॉ. तावरे यांनी मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून त्या जागी शिवानीच्या रक्ताचे नमुने देण्याचा कट रचला. त्यासाठी अश्पाक मकानदार आणि अमर गायकवाडच्या मार्फत डॉ. हाळनोरने तीन लाख रुपयांची लाच स्वीकारली.
– अल्पवयीन मुलाला संभाव्य शिक्षेपासून वाचविण्यासाठी सर्व आरोपींनी गुन्हेगारी कट रचून खोटे दस्तावेज तयार करण्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यासाठी दोन डॉक्टरांना मोठ्या रकमेची लाच देऊ केली, हे दर्शविणारे भरपूर पुरावे नोंदीवर आहेत.
– विशाल आणि शिवानी यांनी त्यांच्या आर्थिक शक्तीचा वापर करून डॉ. हाळनोर आणि डॉ. तावरे यांच्यावर प्रभाव टाकला आणि अल्पवयीन मुलाला वाचविण्याचे उद्दिष्ट साध्य केले.





