Pune: पोलिसांसमोर बदलले दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने

पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणात मद्यधुंद अल्पवयीन मोटारचालक मुलासह त्याच्यासह उपस्थित असलेल्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने पोलिसांसमक्ष बदलण्यात आले, ही बाब आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ मोटारचालक मुलाऐवजी त्याच्या आईने रक्ताचे नमुने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात ९०० पानांचे आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात नुकतेच दाखल करण्यात आले. “बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलासह त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलण्यात आले. ससून रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात डॉ. अजय तावरे याच्या आदेशानुसार डॉ. श्रीहरी हाळनोर याने एका कनिष्ठ महिला डॉक्टरच्या मदतीने रक्ताचे नमुने बदलण्यात आले.
त्यावेळी तेथे काही पोलीसही उपस्थित होते,’ असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोपपत्रात आरोपींची संख्या, त्यांचा सहभाग, त्याबाबत साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला.
अधिक बोलण्यास पोलिसांचा नकार, पण…
आमदार सुनील टिंगरे यांचे चार्जशिटमध्ये नाव नसल्याची माहिती पुढे आली आहे. अपघातानंतर आमदार टिंगरेंनी अगरवाल कुटूंबाच्या मदतीला सर्वांत आधी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. तसेच सुरुवातीला लोकप्रतिनिधीने दबाव टाकल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच टिंगरे यांची गुन्हे शाखेने चार तास चौकशी केल्याची माहितीही समोर आली होती. यानंतर स्वत: अजित पवारांनी टिंगरेंचा काही संबंध नसल्याचा खुलासा केला होता. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र, पुरवणी चार्जशीटमध्ये आणखी काही नावांचा समावेश होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.





