पुणे | नशेत अल्पवयीन तरुणीची आत्महत्या

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांनी केलेल्या मद्य पार्टीचे प्रकरण ताजे असतानाच, येरवडा भागात एका १६ वर्षीय मुलीने मैत्रिणीसोबत घरी मद्यपार्टी केली. पार्टीनंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, तर आत्महत्या करणाऱ्या मुलीसोबत असलेली मैत्रीण बेशुद्धावस्थेत आढळून आली आहे. सध्या तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुलीच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी येरवडा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी येरवड्यातील लक्ष्मीनगर भागातील असून, ती एका महाविद्यालयात अकरावीत शिकत होती.
तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी (१५ जुलै) सायंकाळी तिने घरी मैत्रिणीला बोलावून मद्य पार्टी केली. शेजारी राहणार्या एका मुलाला तिच्या मैत्रिणीने फोन करून रात्री आठच्या सुमारास बोलवून घेतले. त्यानंतर मुलगा घरी आला. त्याने घरात डोकावून पाहिले. तेव्हा त्या मुलीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याने मृतदेह खाली उतरून चेहर्यावर पाणी मारले व तिच्या आईला या घटनेची माहिती दिली.
त्यानंतर आत्महत्या करणाऱ्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या वेळी तिची मैत्रीणही बेशुद्धावस्थेत सापडली. तिला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तेव्हा ती मद्याच्या नशेत असल्याचे लक्षात आले. तिच्या आई-वडिलांनी तिला ससून रुग्णालयात दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता, दोन्ही मैत्रिणींनी मद्य पार्टी केल्याचे उघडकीस आले. पार्टीनंतर त्यांनी उलट्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पार्टीत दोघींना नशा झाली होती, त्यामुळे अल्पवयीन मुलीने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास घेतला, याबाबतची माहिती समजू शकली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रकुमार शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
दोघी मुलींनी मद्यप्राशन केले होते. त्यातील एका मुलीने गळफास घेतल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, दुसर्या मलीचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. शवविच्छेदन अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यामध्ये मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. – विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त परिमंडळ चार





