पुणे | १ हजार ६८४ मद्यपीं चालकांवर कारवाई

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई (ड्रंक अँड ड्राइव्ह) तीव्र केली आहे. पोलिसांनी गेल्या दीड महिन्यांत आतापर्यंत १ हजार ६८४ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केले असून त्यांचे वाहन परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे.
कल्याणीनगर भागात (दि. १९ मे) भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध कारवाई केली होती. या अपघात प्रकरणानंतर पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र केली.
मद्य पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. तात्पुरता परवाना निलंबित केल्यानंतर पुन्हा मद्य पिऊन वाहन चालविल्याचे आढळून आल्यास परवाना कायमस्वरुपी रद्द केला जाणार आहे. त्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.
दीड महिन्यांत १२ कोटींचा दंड…
शहर परिसरात वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई तीव्र करण्यात आली आहे. दि. २१ मे ते ८ जुलै या कालावधीत एक लाख ५८ हजार २६९ बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२ कोटी २१ लाख ९३ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मद्य पिऊन वाहन चालविणे, भरधाव वाहन चालविणे, वाहन क्रमांक नसलेले वाहन चालविणे, ट्रिपल सीट, विरुद्ध दिशेने जाणे अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
शहरात दि. १ जानेवारी ते दि. ३० जून या कालावधीत १६८४ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे परवाने तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविला आहे. परवाना निलंबितनंतर पुन्हा मद्य पिऊन वाहन चालविताना चालक आढळूल्यास परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. तशी तरतूद कायद्यात आहे. रोहिदास पवार, पोलीस उपायु्क्त, वाहतूक शाखा





