अर्थसंकल्प सादर करताच शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 300 अंकांनी घसरला

Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय, 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न देखील करमुक्त करण्यात आले आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करताच याचा परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळत आहे.
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजारात दुपारी 12.40 वाजता 300 अंकांनी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास 300 अंकांच्या घसरणीसह बीएसई सेन्सेक्स 77,210 अंकांवर व्यवहार करत होता. तर निफ्टी50मध्ये 100 अंकांची घसरण पाहायला मिळाली. निफ्टी50 यावेळी 23,405 अंकांवर व्यवहार करत होता. आता अर्थसंकल्प सादर केल्यानंतर बाजारात पडझड सुरू झाली आहे.
मात्र, काही कंपन्यांच्या शेअर्सला याचा फायदाही झाला आहे. गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स, ब्रिटानिया, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल), मॅरिको, टाटा कंझ्युमर आणि वरुण बेव्हरेजेस या एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमती वाढल्या आहेत.
आज सकाळी शेअर बाजाराची संथ सुरुवात झाली होती. बीएसई सेन्सेक्स आज सकाळी 137.23 अंकांनी वाढून 77637 अंकांवर व्यवहार करत होता. तर एनएसई इंडेक्स निफ्टी50 अवघ्या 20.20 अंक किंवा 0.08 टक्क्यांनी वधारून 23,528 अंकांवर उघडला. अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा होण्याआधी बाजारात स्थिर सुरुवात पाहायला मिळाली.
गेल्या 10 वर्षांत एकूण 14 वेळा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. यातील 8 वेळा अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजार घसरण पाहायला मिळाली, तर 6 वेळा शेअर बाजारात तेजी राहिली आहे.





