ENG vs WI 2nd Test : अँडरसनच्या निवृत्तीनंतर ‘या’ घातक गोलंदाजाला इंग्लडंच्या संघात मिळाली संधी…

England Cricket – वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या निवृत्तीनंतर वेस्ट इंडिजविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने मार्क वुडचा संघात समावेश केला आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून 188वा कसोटी सामना खेळल्यानंतर अँडरसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
वुड (वय 34 वर्षे) मंगळवारी नॉटिंगहॅममध्ये संघात सामील होईल. मार्चमध्ये भारत दौऱ्यावर इंग्लंडच्या कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. तो इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणात सामील होईल. ज्यात गेस ऍटकिन्सन, ख्रिस वोक्स आणि ‘अनकॅप्ड’ डिलन पेनिंग्टन यांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यात इंग्लंडच्या टी-20 विश्वकरंडक मोहिमेतून परतल्यानंतर वुडने अद्याप डरहॅमसाठी प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. गुरुवारपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात काय घडले?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात इंग्लंडने त्यांचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने तिसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिजचा पराभव करून सामना जिंकला.





