पुणे जिल्हा | लक्ष्मीबाई ब्रीजच्या दुरुस्तीनंतर निकृष्ट कामामुळे खचला रस्ता

भोर, (प्रतिनिधी) – भोर येथील संस्थान कालीन राणी लक्ष्मीबाई ब्रीज हा दुरुस्तीसाठी अनेक दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे सर्व वाहतूक नवीन पुलावरून वळविण्यात आली होती. नवीन पुलावरील वरचा थर काढून टाकण्यात आला होता.
अशा परिस्थितीत नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करीत होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी जून्या पुलावरून डांबरीकरण केल्यावर खुला करण्यात आला होता. निकृष्ट कामामुळे एकच दिवसात त्या रस्त्यावर खड्डा पडल्याची घटना समोर आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
भोर शहरात वाहतुकीसाठी खुले झालेला जुन्या पुलावरील नवीन रस्ता खचल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. जुन्या पुलाचे रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर दोन दिवसांपूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, रस्ता सुरू झाल्यावर लगेचच तो खचला आणि मोठा खड्डा पडल्याने केलेल्या रस्ताचे डांबरीकरणाच्या दर्जा वर प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रस्ता पूर्ण झाल्यावर दुसऱ्याच दिवशी मुसळधार अवकाळी पाऊस झाला होता आणि त्यानंतर या पुलावरून वाहतूक सुरू झाली होती. नागरिकांचा असा आरोप आहे की, रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने आणि घाईघाईने करण्यात आले, ज्यामुळे हा रस्ता लवकर खराब झाला आहे.
या खड्याचे फोटो प्रसारित झाल्या नंतर तत्काळ पी डब्लु डी विभागाने दखल घेत तो खड्डा बुजविण्याचे काम केले असल्याचे पाहायला मिळाले. परंतु करण्यात आलेल्या निकृष्ट दर्ज्याच्या कामावर ठिगळ लावण्याचे काम करण्यात आल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि संबंधित विभागावर कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.





