Pune: पावसानंतर मध्यवस्तीत पुन्हा वाहतूक कोंडी

पुणे – खडकवासला धरणातून विसर्ग केल्यामुळे बाबा भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे जंगली महाराज रस्त्यासह शहरातील मध्यवर्ती भागांत प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
पुणे आणि वाहतूक कोंडी हे आता जणू समीकरणच तयार झाले आहे. पुण्याच्या अनेक छोट्या छोट्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना पाहायला मिळत आहे. त्यात पावसाळा सुरू झाला, की विचारायचीच सोय नाही. रस्ते वाहतूक कोंडीने तुंबून जातात. त्यातच शनिवारी पावसामुळे अनेकांनी चारचाकी मोटारी बाहेर काढल्या होत्या. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी मध्यवर्ती भागात नागरिकांनी धाव घेतली होती.
पण, भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता वाहतुकीस बंद झाला. यामुळे नारायण पेठ, लकडी पूल, टिळक पूल, महापालिका परिसर, शनिवारवाडा परिसर टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीत अडकलेले नागरिक रस्ता दिसेल तसे आडव्या तिडवी वाहने हाकत असल्याने कोंडीत आणखी भर पडली होती. यामुळे अनेक ठिकाणी नागरिक वादावादी आणि हातघाईवर आलेले दिसत होते. स्थानिक रहिवासी आणि दुकानदारांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी धाव घेतल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते.





