मुंब्रा दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; लोकलला बसणार स्वयंचलित दरवाजे, कशी आहे रचना? समजून घ्या….

Mumbra train accident : काल ९ जून हा दिवस मृत्यूवार ठरला. मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ एक मन्न सुन्न करणारी दुर्देवी घटना घडली. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या एका धोकादायक वळणावर दोन रेल्वे गाड्या एकमेकांशेजारून जात असताना प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासून, काही प्रवासी खाली पडले. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
या दुर्देवी घटनेनंतर रेल्वे प्रशासनावर बोट ठेवण्यात आले आहे. अशातच आता रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. लोकलमधून अशा प्रकारच्या दुर्घटना घडून नयेत, त्यावर उपाय म्हणून लोकलमध्ये स्वयंचलित पद्धतीने बंद होणारे दरवाजे बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॅा. स्वप्नील नीला यांनी दिली आहे.
कशी असेल व्यवस्था?
सध्याच्या लोकलमध्ये दरवाजे बंद केल्यास हवा बंद होऊन प्रवासी गुदमरण्याची शक्यता अधिक आहे. यावर उपाय म्हणून रेल्वे नैसर्गिक हवेच्या प्रवाहासाठी लूवर्स (हवा ये-जा करण्यासाठी झापड असलेले स्वयंचलित दरवाजे) आणि छतावरील व्हेंटिलेटर लावणार आहे. त्याचबरोबर सर्व लोकल डब्यांची जोडणी (व्हेस्टिब्यूल) एकमेकांना करण्यात येईल. याचा फायदा गर्दी विभागण्यास होईल, रेल्वे प्रशासनाने २३८ एसी लोकल रेल्वे खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, ही लोकल कार्यान्वित होण्यासाठी २०२६ हे साल उजाडणार आहे.
दोन्ही रुळांवरील अंतराचे मोजमाप
ज्या ठिकाणी ही दुर्देवी घटना घडली, त्या धोकादायक वळणावरील दोन्ही रुळांवरील अंतराचे मोजमाप पोलीस अधिकाऱ्यांनी घेतले आहे. या घटेनेचा पुढील तपास आणि चौकशी करण्यात येत आहे.
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत
जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मृतांच्या नातेवाइकांची भेट घेऊन पाच लाखांची मदत घोषित केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जखमींची विचारपूस केली.
हेही वाचा: “ठाकरे बंधूंच्या युतीला मनसेचा ब्रेक, देशपांडेंनी फेटाळलं शक्यतांचं गणित”; चर्चांना पूर्णविराम”





