“ठाकरे बंधूंच्या युतीला मनसेचा ब्रेक, देशपांडेंनी फेटाळलं शक्यतांचं गणित”; चर्चांना पूर्णविराम”

मुंबई : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतच्या चर्चांना अखेर मनसेकडून पूर्णविराम मिळाला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, “ठाकरे बंधूंची युती होणे अशक्य आहे. ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू आहे आणि युतीसाठी मीडियाच उत्सुक आहे,” असे परखड मत त्यांनी मांडले आहे. एका लग्नसमारंभात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
देशपांडेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात ही चर्चा जोर धरत आहे की, जर मनसेच युतीला नकार देत असेल, तर भविष्यात ठाकरे बंधूंचे राजकीय एकत्रीकरण अशक्यच ठरते.
या लग्नसमारंभाला उपस्थित असलेले ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू व मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
कुटुंबीय आणि पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न निष्फळ?
अलीकडे ठाकरे कुटुंबातील काही सदस्य आणि दोन्ही पक्षांतील काही पदाधिकारी या दोन नेत्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, अद्याप कोणतेही ठोस संकेत किंवा युतीसंदर्भात एकमत झालेले नाही. देशपांडेंच्या विधानाने अशा प्रयत्नांनाही फटका बसल्याचं स्पष्ट होतंय.
राजकीय गणितात काँग्रेस अडथळा?
युती झालीच तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसे काँग्रेसला सहभागी करून घेण्यास तयार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या सहभागावरून मतभेद संभवतात, पण यावर कोणीही उघडपणे बोलायला तयार नाही.
भाजप-शिवसेनाही चिंतेत?
ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचा कल त्यांच्या दिशेने झुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे गट) व भाजपमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे. मात्र, सध्या तरी भाजपकडून कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
राजकीय तज्ज्ञांचं मत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच घरातील असले तरी दोघांमध्ये राजकीय आणि वैचारिक मतभेद फार पूर्वीपासून आहेत. त्यामुळे त्यांची युती होण्याची शक्यता फारच कमी असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे.





