सरन्यायाधिशांच्या दणक्यानंतर सीबीआय लागली कामाला

नवी दिल्ली – न्यायाधिशांना दिल्या जाणाऱ्या धमकांच्या संबंधात सीबीआय आणि अन्य केंद्रीय तपास यंत्रणा काहीच उपाययोजना करीत नाहीत अशी जाहीर तक्रार करून सरन्यायाधिश रमणा यांनी सीबीआयची परवा बरीच खरडपट्टी केली होती.
या पार्श्वभूमीवर आता सीबीआय जरा जागी झाल्याचे दिसून येत असून त्यांनी आंधप्रदेश हायकोर्टाच्या न्यायाधिशांच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे.
आंध्रप्रदेश हायकोर्टाच्या न्यायाधिशांच्या विरोधात दोन वर्षांपुर्वी सोशल मिडीयांमध्ये अशा स्वरूपाच्या ज्या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या त्याच्या कटाचा छडा लावण्याची गरज कोर्टाने व्यक्त केली होती. पण त्याकडे त्यावेळी दुर्लक्ष झाले होते. पण आता सरन्यायाधिशांनीच कानउघडणी केल्यानंतर आता सीबीआयने या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.
सीबीआयकडून कोणत्याच मदतीचे काम होत नाही आणि मी हा आरोप जबाबदारीने करीत आहे असे सरन्यायाधिश रमणा यांनी नुकतेच म्हटले होते. झारखंड मध्ये एका न्यायाधिशाच्या अंगावर रिक्षा घालून त्याची हत्या करण्याचा प्रकार घडला होता. त्याच्या सुनावणीच्यावेळी सरन्यायाधिशांनीही सीबीआयला धारेवर धरले होते.





