केंद्र सरकारच्या आवाहनानंतर वाहनचालकांचा संप मागे

पुणे – हिट अँड रन 2023 हा नवीन कायदा रद्द व्हावा, यासाठी ३ जानेवारीपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन हे रद्द करण्यात आले आहे.केंद्र सरकारच्या गृहसचिवांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
देशभरात चालू असलेल्या हिट आणि रन प्रकरणाबाबत केंद्र सरकारच्या गृहसचिव यांनी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस, नवी दिल्ली यांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. या बैठकीत नवीन नियमावली लागू करण्यात आली नसून, ती लागू करण्याच्या आधी त्यातील त्रुटी बाबत ऑल इंडिया मोटर काँग्रेस यांच्याशी चर्चा करूनच अंतिम आदेश काढण्यात येईल, असे अश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले आहे. त्यामुळे संपावर गेलेल्यांनी पुन्हा कामावर हजर रहावे असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. त्यानुसार उद्यापासून संप मागे घेण्यात येत आहे.
दरम्यान या आंदोलनात पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातून हजारो चालक सहभागी होण्यासाठी दिल्ली येथे रवाना झाले असल्याचे ऑटो, टॅक्सी, ट्रक, बस, चालक मालक फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक आनंद तांबे, महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी एकनाथ ढोले पाटील, सचिन तांबे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहराध्यक्ष मोहम्मद शेख, अशोक साळेकर उपस्थित होते.





