Mallikarjun Kharge | Narendra Modi – कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नव्या विधेयकांवरून भाजपवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. भाजपेतर पक्षांची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील सरकारे पाडण्यासाठी ती विधेयके आणली गेली. मतचोरीनंतर भाजप सत्ताचोरीत मग्न झाल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारने नुकतीच पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना अटक झाल्यास पदांवरून हटवण्याची तरतूद असणारी विधेयके आणली. त्या विधेयकांना विरोधी पक्षांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. अशात खर्गे यांनी रविवारी कॉंग्रेसच्या एका बैठकीत बोलताना विधेयकांचा संदर्भ घेऊन भाजपवर टीकेची झोड उठवली. अटकेच्या घडामोडीचा वापर शस्त्रासारखा करून लोकशाही अस्थिर केली जाईल. जनतेला सरकारांची निवड करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार नवी विधेयके हिरावून घेतील. संबंधित अधिकार ईडी आणि सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणांना दिला जाईल. तसे घडणे म्हणजे लोकशाहीवर बुलडोझर चालवण्यासारखेच होईल, असा इशारा त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराविरोधात जोर-जोरात बोलतात. मात्र, भाजपने ज्यांना भ्रष्टाचारी म्हटले; त्यांनाच पक्षात प्रवेश दिला. काहींना थेट मंत्रिपदे देण्यात आली, असे म्हणत त्यांनी विसंगती दर्शवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या टीकेतून विरोधक नव्या विधेयकांविरोधात आक्रमक पवित्रा कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट झाले.