पुणे – बुधवारी पहाटे पत्नीचा खून करून पोलिसांत हजर झालेल्या अरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याची बातमीही प्रसिध्द झली; मात्र नेटकरी तेंव्हा हदरले जेंव्हा या नराधमाने पत्नीच्या मृतदेहाशेजारी उभे राहून आणि शेजारी मुलाला खुर्चित बसवून लाईव्ह व्हीडीओ केला आणि त्यात पत्नीच्या खुनाची कबुली दिली. गुरुवरी दिवसभर हा व्हीडीओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. कौटुंबिक वादातून शिवदास तुकाराम गिते (३७) याने पत्नी ज्योती शिवदास गिते हिचा कात्रीने गळा कापून खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर शिवदासने समाजमाध्यमावर लाईव्ह येत पत्नीचा खून का केला, हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो ज्योतीला त्याने का मारले हे सांगत आहे. दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असताना त्यांचा पाच वर्षाचा मुलगा खोलीतच खुर्चीवर बसून होता. त्यानंतर शिवदास स्वतः मुलासह खराडी पोलिस ठाण्यात हजर झाला आणि माझी पत्नी ज्योती सतत माझ्यासोबत वाद घालत असल्यामुळे मी तिला राहत्या घरी मारून टाकले आहे, असे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पोलिसांनी शिवदासला तातडीने ताब्यात घेतले. याप्रकरणी, ज्योती यांची बहीण सविता हरिभाऊ नागरगोजे (३७, रा.लोणीकाळभोर, मुळ.पाथर्डी,जि. अहिल्यानगर) यांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानुसार पोलिसांनी शिवदास विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवदास शिवाजीनगर कोर्टात करारावर स्टेनोग्राफर म्हणून काम करत होता. तो स्टेनोची ॲडव्हांन्स परिक्षा नापास झाला होता. त्या विरुध्द तो उच्च न्यायालयात गेला होता. न्यायालयाने त्याला काही महिन्यांची मुदत दिली होती. यामुळे पत्नी सातत्याने त्याच्या मागे अभ्यास कर, असा तगादा लावत होती. यामुळे रागाच्या भरात खून केल्याची प्राथमिक कबुली त्याने दिली आहे. “आरोपी मुळचा बीडचा आणि मृत पत्नी अहिल्यानगरची आहे. हा पती-पत्नीतील वाद आहे. व्हिडिओ तपासाचा भाग असल्याने त्या संदर्भात जास्त भाष्य करता येणार नाही” – हिंमत जाधव (उपायुक्त , परिमंडळ चार)