Tahawwur Rana: तहव्वुर राणाचे भारतात आगमन: विमान उतरताच अटक, वैद्यकीय तपासणी अन् तिहार जेलचा रस्ता!

नवी दिल्ली – 2008 च्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा अमेरिकेतून प्रत्यर्पणानंतर भारतात दाखल होत आहे. काही वेळातच त्याला घेऊन येणारे विमान दिल्लीतील पालम हवाई दलाच्या तळावर उतरणार आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये हवाई तळावर रुग्णवाहिका आणि सुरक्षा वाहने दिसत आहेत. विमान उतरताच राणाला औपचारिकपणे अटक करून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल. विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, बॉम्बशोधक पथकही तैनात आहे.
सूत्रांनुसार, राणाला बुलेटप्रूफ वाहनातून लोदी रोडवरील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुख्यालयात नेण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याला पटियाला हाऊस कोर्टातील एनआयएच्या विशेष न्यायाधीशांसमोर हजर केले जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव त्याची व्हर्च्युअल पद्धतीने सुनावणी होईल. त्यानंतर राणाला तिहार जेलमध्ये हलवले जाईल, पण तत्पूर्वी पुन्हा वैद्यकीय तपासणी होईल.
एनआयएची 12 जणांची टीम करणार चौकशी –
तिहार जेलमध्ये राणासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था आहे. त्याला उच्चसुरक्षा कक्षात ठेवले जाईल. एनआयएचे अधिकारी तिथेच त्याची चौकशी करून मुंबई हल्ल्याची गुपिते उघडतील. यासाठी एनआयएने 12 जणांची टीम तयार केली आहे, ज्यात डीआयजी सदानंद दाते, डीआयजी जया रॉय आणि आयजी आशीष बत्रा यांचा समावेश आहे.
हेडली, आयएसआय आणि पाक सैन्याची कडी –
राणाने हल्ल्यापूर्वी मुंबईतील लक्ष्यांची पाहणी केली होती आणि दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड कोलमैन हेडलीला पाकिस्तानी-अमेरिकन पासपोर्टाद्वारे भारतात येण्यास मदत केली होती. हा कट लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानच्या आयएसआयसोबत मिळून रचला गेला. 64 वर्षीय पाकिस्तानी-कॅनेडियन नागरिक राणा हा हेडली, आयएसआय आणि पाक सैन्य यांच्यातील दुवा होता. त्याच्यावर भारतीय कायद्यानुसार जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
दरम्यान, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला हा भारतातील सर्वात भीषण हल्ल्यांपैकी एक मानला जातो. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने 10 हल्लेखोरांना समुद्रमार्गे मुंबईत पाठवले. त्यांनी ताजमहाल पॅलेस, ओबेरॉय ट्रायडेंट, छत्रपती शिवाजी टर्मिनस, नरीमन हाऊस आणि इतर ठिकाणी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले. हा हल्ला 26 ते 29 नोव्हेंबरपर्यंत चालला, ज्यात 166 लोकांचा मृत्यू झाला आणि 300 हून अधिक जखमी झाले. भारतीय सुरक्षा दलांनी 9 हल्लेखोरांना ठार केले, तर अजमल कसाब हा एकमेव जिवंत पकडला गेला. या घटनेने देशाला हादरवून सोडले आणि जागतिक पातळीवर निषेध व्यक्त झाला. या हल्ल्याच्या कटात राणा होता.





