Sanju Rathod:तरुणाईच्या मनावर राज्य करणारा गायक संजू राठोड पुन्हा एकदा आपल्या नव्या रोमँटिक गाण्याने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘गुलाबी साडी’ आणि ‘शेकी शेकी‘ सारख्या सुपरहिट गाण्यांनंतर आता त्याचं नवं गाणं ‘पिल्लू’ प्रेक्षकांच्या मनात पुन्हा एकदा घर करणार आहे. हे गाणं ‘जीएमई म्युझिक’ या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालं असून, प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. भावस्पर्शी सूर, नयनरम्य लोकेशन आणि नवी जोडी या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये संजू राठोड आणि सेजल नायकरे यांची ताजी आणि आकर्षक जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकतेय. गाण्याचं दिग्दर्शन अभिजीत दाणी यांनी केलं असून, संगीत दिग्दर्शन ‘जी-स्पार्क’ने केलं आहे. गाण्याला संजू राठोड आणि मयुरी हरिमकर यांच्या आवाजाने साज चढवण्यात आला आहे. विशेष म्हणजे गाण्याचे बोलही संजूने स्वतः लिहिले असून, त्याचं कम्पोझिशनही त्याने स्वतः केलं आहे. ‘पिल्लू’ म्हणजे रोमँटिक पावसाळी ट्रीट संजू राठोड म्हणतो, “हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. मी याची रचना स्वतः केली आहे. ‘गुलाबी साडी’ आणि ‘शेकी शेकी’ गाण्यांना जसं प्रेम दिलंत, तसंच प्रेम ‘पिल्लू’लाही द्या.” श्रावणात आलेलं हे गाणं एका भावनिक प्रेमकथेसोबत प्रेक्षकांना संगीताच्या मधुर सुरांनी न्हालून टाकतं. चित्रीकरणात आले अडथळे, पण टीमनं निभावलं ‘पिल्लू’चं शूटिंग नाशिकजवळील घोटी परिसरातील दौंडत गावात पार पडलं. गावातील निसर्गसंपन्न वातावरणामुळे गाण्याला एक वेगळीच पार्श्वभूमी लाभली. मात्र या ठिकाणी बिबट्यांचा वावर असल्याने शूटिंगदरम्यान सुरक्षेची काळजी घ्यावी लागली. शूट दरम्यानच प्रोडक्शन टीममधील एक सदस्य जेव्हा नाशिक शहरातून परतत होता, तेव्हा त्यांच्या गाडीसमोर प्रत्यक्ष बिबट्याने वाट अडवली होती. त्यामुळे संपूर्ण टीममध्ये थोडं दडपण आलं होतं, पण सर्वांच्या एकजुटीमुळे शूट व्यवस्थित पार पडलं. संजूच्या तब्येतीने उडवली चिंता गाण्याच्या शूटिंगदरम्यान संजू राठोडला धुळीची तीव्र अॅलर्जी झाली होती. त्याचे ओठ आणि डोळे सुजल्याने शूट काही वेळासाठी थांबवावं लागलं. तातडीने डॉक्टरांकडे नेल्यानंतर तब्बल पाच तासांनी सूज उतरली आणि मग पहिला टेक घेण्यात आला. दिग्दर्शक अभिजीत दाणी म्हणाले, “संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फलित म्हणजे आज प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद.” संजू राठोडचं ‘पिल्लू’ हे गाणं केवळ एक नवीन रोमँटिक गीत नसून, त्यामागे अनेक भावनिक, कलात्मक आणि प्रत्यक्ष अनुभवांनी भरलेला प्रवास आहे. श्रावणात प्रेमाची गोडी अनुभवायची असेल, तर ‘पिल्लू’ नक्की ऐका!