Sanju Rathod : शेकी गाण्याच्या यशानंतर संजू राठोडचं नवीन गाणं प्रदर्शित; ‘सुंदरी’ गाण्यात झळकली ही अभिनेत्री, Video पाहा

Sanju Rathod : ‘नऊवारी साडी’, ‘गुलाबी साडी’, ‘काली बिंदी’पासून ते अगदी काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या शेकी या गण्यापर्यंत संजू राठोडची गाणी हिट ठरली आहेत. या गाण्यामुळे संजू राठोडला मोठी प्रसिद्ध मिळाली. ही गाणी सोशल मीडियावर धूमाकूळ घालत असून आता त्याचं नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. हे गाणही प्रेक्षकांच्या चागलंच पसंतीस उतरताना दिसत आहे. या गाण्याचं नाव सुंदरी असून काल ११ सप्टेंबर या दिवशी रात्री आठ वाजता हे गाण संजू राठोडच्या यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या गाण्याला अवघ्या १० तासांत ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून संजूची क्रेझ तरुणाईमध्ये किती मोठ्या प्रमाणात आहे हे स्पष्ट झालं आहे. खरंतर संजूचा चाहतावर्ग मोठा आहे. शेकीच्या यशानंतर त्याने सुंदरी हे गाणं लॅान्च केलं आहे. संजूच्या प्रत्येक म्युझिक व्हिडीओमध्ये नवनवीन अभिनेत्रींना संधी दिली जाते. या गाण्यातही एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे.
‘सुंदरी’मध्ये लोकप्रिय इन्फ्लुएन्सर यशिका जातव झळकली आहे. हे गाणं ३ मिनिटं १७ सेकंदांचं आहे. या गाण्याला बंजारा लिरिक्स देण्यात आल्या आहेत. “टक टक देख रो सांवरिया” या बंजारा ओळी ‘सुंदरी’ गाण्यात लक्ष वेधून घेत आहेत. या नव्या गाण्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “संजूचं नवीन गाणं पुन्हा एकदा ट्रेंड होणार”, “मराठी भाषेला तुझ्यामुळे जगभरात एक वेगळी ओळख मिळाली…अशा काही कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. यामुळे आता संजू राठोडच सुंदरी हे गाणही धूमाकूळ घालणार असल्याचं दिसत आहे.





