छत्रपती संभाजीनगर : काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एबी फॅार्म मिळवण्यासाठी मोठी धावाधाव इच्छकांकडून करण्यात आली. यात कहर म्हणजे एबी फॅार्म मिळविण्यासाठी चक्क एका चारचाकी गाड्याचा पाठलाग करण्यात आला. ज्यांना एबी फॅार्म मिळाला नाही त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. एका महिलेने तर आत्मदहनाचा इशारा दिला. काही महिलांना अश्रू अनावर झाले असे काहीसे चित्र एबी फॅार्म मिळविण्यासाठी पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील नाट्यमय घडामोडी काल दिवसभरात घडल्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये रशीद मामू हे नाव चर्चेचे ठरले होते. अखेर त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून तिकीट मिळाले असून त्यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील दोन नेत्यांपैकी एकाचा विरोध तर एकाने सहमती दर्शवली होती. यामुळे अंतर्गत मतभेद समोर आले होते. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत चंद्रकांत खैरे विरुद्ध अंबादास दानवे असा सुप्त संघर्ष रंगला होता. अखेर रशीद मामू यांना उमेदवारी मिळाली आहे. रशीद मामू हे काँग्रेसचे माजी महापौर राहिलेले आहेत. काही दिवसांपूर्वीच अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने मुंबईतील शिवसेना भवनात रशीद मामू यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उबाठा गटात पक्ष प्रवेश झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांना फटकारले होते. माझा तुला विरोध आहे अशा शब्दांत खैरेंनी रशीद मामूंच्या उमेदवारीला विरोध दर्शवला होता. मात्र, चंद्रकांत खैरेंच्या विरोधानंतरही रशीद मामूंनी उमेदवारी मिळवलीच. अंबादास दानवे यांनी माजी महापौर राहिलेल्या अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. भाजप-सेना युती तुटली छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत जागावाटपाच्या संघर्षावर तोडगा निघू न शकल्याने भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. याबाबतची घोषणा शिवसेनेचे नेते मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत केली. हेही वाचा : मुकाल्ला बॉम्बस्फोटानंतर युएईचा मोठा निर्णय ; सौदी अरेबियातून सैन्य मागे घेण्याची घोषणा