Pune News : 8 तासांच्या अथक प्रयत्नानंतर विमानतळ परिसरातील बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश

प्रभात वृत्तसेवा
पुणे : दि. १२ – एप्रिल 2025 पासून पुणे विमानतळ रल्वे परिसरात अधूनमधून दिसणारा एक प्रौढ नर बिबट्याला गुरुवारी रात्री (११ डिसें.) रोजी पुणे वनविभागाच्या नेतृत्वाखाली, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, हवाईदल आणि विमानतळ प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नातून पकडण्यात आले.
हा बिबट्या 28 एप्रिल रोजी पहिल्यांदा लोहगाव विमानतळावर धावपट्टी नजिक दिसला. त्यानंतर तो गुरुवार पर्यंत विमानतळ परिसरातील भूमिगत बोगदे, दाट झुडपे आणि कमी मानवी हालचाली असलेल्या भागांचा वापर करून तेथेच फिरत राहिला. विमानतळाचा विस्तृत आणि संवेदनशील परिसर लक्षात घेता, त्याला पकडण्याच्या प्रयत्नांना अनेक गंभीर तांत्रिक आणि सुरक्षा विषयक अडचणींचा सामना करावा लागला. कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजरे यांद्वारे सातत्याने निरीक्षण ठेवण्यात आले, परंतु बिबट्याने वेळोवेळी गुंगारा दिला.
चार डिसेंबरला पुन्हा एकदा त्याचे दर्शन झाले. तो एका भागात लपल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्व संभाव्य बाहेर पडण्याचे मार्ग बंद आणि मजबूत करण्यात आले, अतिरिक्त लाईव्ह निरीक्षण करणारे कॅमेरे बसवण्यात आले आणि तेथील हालचाली अधिक अचूकपणे समजण्यासाठी कॅमेरा ट्रॅपचे पुनर्स्थापन करण्यात आले.
या माहितीच्या आधारे, ११ डिसेंबर ला सुमारे 30 सदस्यांच्या संयुक्त पथकाने एक केंद्रित योजना राबवली आणि उपरोक्त तिन्ही विभागांनी समन्वय करून बिबट्याला अंदाजे ८० फूट लांबीच्या बोगद्यात नेण्याची मोहीम आखली, जेणेकरून नियंत्रित परिस्थितीत त्याला शांतपणे बेशुद्ध करता येईल.
अत्यंत मर्यादित जागा असूनही, वन्यजीव वैद्यक तज्ज्ञ डॉ. गौरव मंगला यांनी बिबट्याला यशस्वीपणे डार्ट केले. बिबट्याला त्यानंतर बोगद्यातून सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय निरीक्षणासाठी हलवण्यात आले. या ऑपरेशनला संयम, अचूकता आणि सतत परिस्थितीचे मूल्यमापन आवश्यक होते, असे डॉ. गौरव मंगला म्हणाले. बिबट्याने दोन लाइव्ह कॅमेऱ्याचे नुकसान केले होते आणि मला अत्यंत कठीण कोनातून शॉट घ्यावा लागला. पथकांनी शांत राहून अचूक नियोजनाप्रमाणे कृती केली, त्यामुळेच हे शक्य झाले, असेही मंगला यांनी नमूद केले.
बिबट्या सध्या पूर्णपणे स्थिर असून त्याला पुढील निरीक्षणासाठी बावधन, पुणे येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे विभाग
ही मोहीम म्हणजे सक्षम समन्वयाचे उदाहरण आहे. तिन्ही प्रशासनाने अनेक महिन्यांपासून सातत्याने एकत्र काम केले. संवेदनशील नागरी आणि पायाभूत सुविधांमध्येही जटिल वन्यजीव परिस्थितींना प्रतिसाद देण्याची क्षमता यानिमित्ताने दाखवून दिली आहे.
नेहा पंचमिया, संस्थापक, अध्यक्ष रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट
प्रत्येक वन्यजीवाची सुटका करताना परिस्थिती वेगळी असते आणि निर्णय घाईने नव्हे तर परिस्थिती, वेळ आणि योग्य रणनीतीवर आधारित असावेत. डेटा, तंत्रज्ञान आणि पथकाचा सक्षम समन्वय यामुळे मानव आणि वन्यजीवांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणारे परिणाम शक्य होतात.





